रजेवरील शिपाई बजावतात कर्तव्य!

By Admin | Updated: May 14, 2015 00:45 IST2015-05-14T00:45:53+5:302015-05-14T00:45:53+5:30

अनेक शिपाई महत्वाच्या कामानिमित्त रजेवर गेलेले असतात. मात्र, लग्नसराई असल्याने आर्थिक नुकसान होऊ नये, ...

The duty to play a soldier on leave! | रजेवरील शिपाई बजावतात कर्तव्य!

रजेवरील शिपाई बजावतात कर्तव्य!

वाहनधारकांमध्ये धास्ती
कारवाईची ठोस आकडेवारी नाही, लोंबकळणाऱ्यांविरुद्ध कारवाई कोण करणार?
भंडारा : अनेक शिपाई महत्वाच्या कामानिमित्त रजेवर गेलेले असतात. मात्र, लग्नसराई असल्याने आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी ते रजेवर असतानाही वर्दी घालून कर्तव्य बजावतात. यासाठी ते सहकाऱ्यांना त्यातील काही हिस्सा देऊन सहभागी करून घेतात. सकाळी ९ वाजतानंतर कर्तव्य असतानाही अनेकदा काही वाहतूक शिपाई पहाटेपासून कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत वऱ्हाड्यांच्या वाहनांची वाट बघताना ‘स्टींग आॅपरेशन’ दरम्यान आढळून आले आहेत.
तुमसरचे तालुका प्रतिनिधी मोहन भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लग्नाची लगीनघाई सुरू आहे. प्रत्येक जण खाजगी चारचाकी वाहनांसह दुचाकीने प्रवास करताना दिसत आहेत. याच संधीचा फायदा वाहतूक पोलीस दबा धरून लक्ष्यांवर नेम साधून असल्याचे दिसून येत आहेत. राज्य महामार्ग तथा लहान मोठ्या गावांकडे जाणाऱ्या चौकात सकाळी ६ ते रात्री ८ ते ९ पर्यंत कर्तव्यावर हजर दिसत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आहे. तुमसर तालुक्यातून राज्य महामार्ग, आंतरराज्यीय महामार्ग व प्रमुख जिल्हामार्ग जातो. या प्रमुख रस्त्यावरील चौकात पोलीस दबा धरून असतात.
तुमसर-गोंदिया, तुमसर-रामटेक, तुमसर-भंडारा, तुमसर-कटंगी, तुमसर-वारासिवनी हे प्रमुख राज्य व आंतरराज्यीय मार्ग आहेत. जिल्हा मार्गावर तुमसर-बपेरा, तुमसर-करडी, पालोरा-साकोली, तुमसर-नाकाडोंगरी, चिचोली-बघेडा, लेंडेझरी मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक बाराही महिने सुरू राहते. यापैकी खापा चौक, देव्हाडी चौक, देव्हाडा चौक, चिचोली फाटा येथे पोलीस कर्तव्य बजावताना दिसतात. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. बैलबंडीने वरात जाणे कालबाह्य झाले आहे. दुचाकींची संख्याही मोठी आहे. ट्रॅक्टर व मोठ्या ट्रकमधूनही वरात नेली जाते. नियमांची ऐसीतैशी सर्रास होतानी दिसून येते. अनेक चारचाकी गाड्या नियमबाह्यपणे घरगुती गॅसवर धावत आहेत. पोलीस यांना लक्ष्य करून कारवाई करण्याचे सांगते. प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. पैसे उकळून त्यांना सोडून दिले जाते. एकाचे वाहन दुसऱ्याच्या नावावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहून नेणे असा प्रकार सुरू आहे. अगदी सकाळी ६ वाजता वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यावर पोहोचतात. तसे ठाणे प्रमुखांचेच त्यांना आदेश असावे, असा संशय वर्तविल्यास त्यात वावगे ठरु नये. कारवाईचा धाक दाखवून लूट सुरू आहे. माडगी चौक ते भंडारा सुकळी मार्गे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. जिल्हा मार्गावरील वाहतुकी दरम्यान प्रवाशांना कोंबून वाहतूक सुरू आहे. यात ठाण्याची सीमा बांधली असल्याचे समजते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावताना दिसतात. काही कार्यालयात बसून कागदी घोडे रंगवण्यात व्यस्त आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाचे फावत आहे.

पोलिसांसमोरच लोंबकळत प्रवास
१४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरुनच वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी दिसून येत आहेत. परंतु, त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे अवैध प्रवाशी वाहनचालकांचे फावत आहे. अशातच अपघाताच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी नियमबाह्यरित्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई केलीच पाहिजे. त्यांच्यावर दंड ठोठावला पाहिजे. जेणेकरुन शासनाच्या तिजोरीत पैसा जमा होऊन महसुलात वाढ होईल. परंतु येथे शासनाच्या महसुलापेक्षा स्वत:चा महसूल वाढविण्यातच पोलीस प्रशासन मग्न दिसून येत आहे.
वाहतूक शिपायाचे कर्तव्य
नागरिकांना वाहतूक व्यवस्थेत अडचण निर्माण होऊ नये, म्हणून ठिकठिकाणी वाहतूक शिपायांची नियुक्ती केलेली असते. एखाद्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था बिघडल्यास ती पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी वाहतूक शिपायाची असते. मात्र, नियम माहित असूनही केवळ स्वस्वार्थासाठी वाहनधारकांची लूट सुरु आहे. या प्रकाराला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

धास्तीने होतात अपघात
साकोलीचे शहर प्रतिनिधी शिवशंकर बावनकुळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, लग्न सराईमुळे ट्रॅक्टर, ट्रक, आॅटो, खासगी वाहने हे लवारी, परसोडी, पिंडकेपार, एकोडी, बोंद्रा, विर्सी, सातलवाडा, वळेगाव, कुंभली, सानगाव या मार्गाने वऱ्हाड्यांना ने-आण करणे सुरू आहे. पोलिसांचे हात ओले करुन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सुरू आहे. पोलिसांची नजर चुकविण्याचा प्रयत्न करतात. अशातच पोलीस पाठलाग करीत आहे, असे वाहनचालकाच्या नजरेत आले तर चालक वेग वाढवितात. हा प्रकार अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे.

Web Title: The duty to play a soldier on leave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.