दोन ठिकाणचे धानाचे पुंजणे खाक
By Admin | Updated: December 2, 2015 01:46 IST2015-12-02T01:46:52+5:302015-12-02T01:46:52+5:30
देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अब्दुलटोला (सालई) येथील शेतावर ठेवलेले दोन धानाचे पुंजणे पूर्णपणे जळून राख झाले.

दोन ठिकाणचे धानाचे पुंजणे खाक
मोठे नुकसान : देवरी व नवेगावनजीकची घटना
देवरी/नवेगावबांध : देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अब्दुलटोला (सालई) येथील शेतावर ठेवलेले दोन धानाचे पुंजणे पूर्णपणे जळून राख झाले. याशिवाय नवेगावबांध येथील शेतात ठेवलेले शेतकऱ्याच्या धानाचे पुंजणे जळून राख झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, देवरी प्रभाग क्र.१६ परसटोला येथील रहीवासी ग्यानीराम रामाजी शहारे (५६) याची अब्दुलटोला (सालई) येथे शेती आहे. या शेतावरील धान कापून त्यांनी चुरण्याकरिता दोन मोठे धानाचे पूंजने शेतावरच ठेवले होते. हे दोन्ही पुंजने दोन दिवसांपूर्वी जळालेले आढळले. अज्ञात व्यक्तीने ते जाळल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या आगीत पूर्ण धान जळून राख झाले. या घटनेत शहारे यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. देवरी पोलीसात माहिती देण्यात आली असून शासनाकडून त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
२० हजारांचे नुकसान
नवेगावबांध येथील शेतकरी दुधराम बावनकर यांच्या गट क्र. १२१०/३ आराजी ०.४० हेक्टर आर (एक एकर) जागेतील धानाचे पूंजने रात्रीच्या वेळी जळून राख झाले. खरीपाच्या पिकावरच बावणकर यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा बिकट परिस्थितीत पुंजणे जळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून मदतीची मागणी करण्यात आली.