शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:56 IST2019-07-16T22:55:51+5:302019-07-16T22:56:06+5:30
हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाच्या साधानाने रोवणी केली होती. मात्र पावसाअभावी ती सुध्दा वाळत आहेत. परिणामी रोवण्या वाळण्याच्या तर पेरण्या खोळंबण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
गोंदिया जिल्ह्यात धानाच्या लागवडीचे क्षेत्र आहे.जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस होतो. ऐवढा पाऊस धानाच्या शेतीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत एकूण १४ हजार ८५३ हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकले आहेत. तर १२०० हेक्टरमध्ये रोवणी झाली असून ३ हजार २३९ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी आवत्या टाकला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीच्या कामाला सुरूवात केली होती. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र मागील दहा बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी आणि रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहे. उष्ण दमट वातावरणामुळे पेरणी केलेले बियाणे अंकुरण्याऐवजी वाळत आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरेजावे लागणार आहे.आधीच उधार उसणवारी करुन आणि सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे घेवून बºयाच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. रक्ताचे पाणी करुन व मोठ्या अपेक्षेने पेरणी केली.
मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने बळीराजा चिंतातूर आहे.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास पुन्हा कुणाच्या दारात उभे राहायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावित आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून आहेत.
धरणांना पावसाची प्रतीक्षा
यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला तर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला जोमाने सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पाऊस पुन्हा बेपत्ता झाल्याने नदी, नाले आणि सिंचन प्रकल्प सुध्दा कोरडे पडले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १५ ते १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीटंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणी टंचाईच्या समस्येत वाढ
भूजल पातळी ही सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर बºयाच प्रमाणात अवलंबून असते. मात्र यंदा पावसाची तूट कायम असल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गोंदिया, तिरोडा, गोरेगाव,आमगाव,अर्जुनी मोरगाव या पाच तालुक्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची शक्यता आहे.
४४८ मि.मी.पाऊस पडणे होते अपेक्षित
जिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे १५ जुलैपर्यंत किमान ४४८ मि.मी.पाऊस होणे अपेक्षीत होते. पण त्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ २३६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. १९० मि.मी.पाऊस कमी पडला आहे.गोंदिया तालुक्यात २६५ मिमी, गोरेगाव २३६ मिमी, तिरोडा ३१५ मिमी, अर्जुनी मोरगाव २५६ मि.मी., देवरी १३६ मिमी,आमगाव २९२ मिमी., सालेकसा १९६ मिमी, सडक अर्जुनी १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लागवड खर्च जाणार वाया
पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळत असून येत्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पावसाअभावी केलेल्या पेरण्या संकटात आलेल्या आहे. येत्या आठवडाभरात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. मात्र पाऊस न झाल्यास त्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येतील.
- नंदकिशोर नयनवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया
मागील दहा बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेवून तातडीने उपाय योजना राबविण्याची गरज आहे.
- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांनी आधीच कर्ज काढून खरीप हंगामाची तयारी केली.मात्र पावसाने पाठ फिरविल्याने त्यांना दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने प्रभावीपणे उपाय योजना राबविण्याची आवश्यकता आहे.
- किशोर तरोणे, जि.प.सदस्य.