पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: September 30, 2016 01:55 IST2016-09-30T01:55:51+5:302016-09-30T01:55:51+5:30

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

Due to poor drought on crops | पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

शेतकरी चिंतेत : जास्त पावसामुळे उत्पादनावर परिणाम
सालेकसा : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो. थोडाफार येणे आणि गायब होणे या स्वरूपाचा तो असतो. परंतु यंदा सालेकसा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची दररोज हजेरी असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हलक्या प्रजातीचे धान ९० दिवसांपासून तर ११५ ते १२० दिवसांच्या कालावधीचे असतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या हलक्या धानाची मुदत संपली असून अनेक ठिकाणी हलका धान १०-१५ दिवसात कापणीसाठी सज्ज झालेला असेल. परंतु धान कापणी करण्यासाठी वातावरण अनुकूल असणे आवश्यक असते. जमिनीत ओलावा नसावा तसेच ऊन निघणे आवश्यक आहे. परंतु सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण असते. याचा वाईट परिणाम धान पिकावर पडू शकतो.
धानपीक पूर्ण पिकल्यावर लोंब्याचे वजन वाढते आणि पाऊस वारा आला की उभे धानपीक खाली लोंबकळते. बांध्यात पाणी असल्यास सर्व पकलेले धान नष्ट होतात. सद्याची परिस्थिती बघता असे होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहे. त्याचबरोबर रोज पाऊस पडत असल्याने पकलेल्या पिकांमध्ये वजनदार दाणा (तांदूळ) बनण्यावरही वाईट परिणाम घेऊ शकतो. धानपीक कापणीच्या अवस्थेत आले तर त्याला कापून घेणे आवश्यक असते. जर कापणी केली नाही तर पकलेला धानाचा दाणा आपोआप झडून खाली पडण्याची शक्यता असते.
भर पावसात धान कापणी शक्य नसून कशीबशी कापणी केली तर मळणीचा प्रश्न उभा होणार आहे. मळणीसाठी योग्य जागा मिळणार नाही तसेच स्वच्छ आणि निरभ्र आभाळ नसल्यास मळणीची कामे होऊ शकत नाही. दुसरा धोका असा की, ओलसर धानाचे कडप सडून त्याचे पुंजने ही बनवून ठेवता येत नाही. ठेवल्यास धानही खराब होतील आणि तणीस सुध्दा बनणार नाही.
एकंदरीत हलक्या धानासाठी संकटाचा काळ सुरू झालेला दिसत आहे. मागील काही वर्षानंतर यंदा हलक्या धानाचे समाधानकारक पीक आलेले आहे. यंदा रोगाचा प्रभावसुध्दा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उत्पादन चांगले होणार असे वाटत असताना आता सतत पडत असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हलक्या सरींचा असून तो जास्त काळ पडत राहात नाही, परंतु यंदा या महिन्याभर पडत असून एक-दोन वेळा अतिवृष्टीचा फटका देणारा सुध्दा ठरला. त्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आणखी किती पाऊस पडेल आणि किती नुकसान होईल याची चिंता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to poor drought on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.