आर्द्रतेमुळे धानाची पडक्या दरात खरेदी
By Admin | Updated: November 16, 2014 22:52 IST2014-11-16T22:52:22+5:302014-11-16T22:52:22+5:30
येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार

आर्द्रतेमुळे धानाची पडक्या दरात खरेदी
गोंदिया : येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार समितीत येणाऱ्या धानात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने धानाला आधारभूत किंमत मिळत नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने कबूल केले आहे. मात्र धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला धान बाजार समितीत व्यापाऱ्यांना विकावा लागत असून त्यांची पिळवणूक सुरूच असल्याचे दिसते.
येथील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १५३ गावे येत असून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने येथील शेतकरी आपला धान बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. १ आॅक्टोबरपासून बाजार समितीने धान खरेदी सुरू केली असून यात मध्ये मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची आवक असल्याचे समितीकडूनच कळले आहे. हलक्या धानात आयआर व १०१० या दोन प्रतींच्या धानाची सर्वाधीक आवक आहे. यंदा हलक्या धानाला एक हजार ३६० रूपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बाजार समितीत यापेक्षा कमी दराने धान खरेदी केली जात आहे.
हा प्रकार लोकमतने बातमीतून बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे उजेडात आणले होते. यातही विशेष बाब म्हणजे बाजार समिती प्रशासनाने या प्रकारावर पांघरून घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १३ नोव्हेंबर रोजी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्र देत शेतकऱ्याप्रतीचा आपला कळवळा व्यक्त केला.
तर या निवेदनात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या धानात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने धानाला आधारभूत किंंमत मिळत नसल्याचे नोंदविले आहे. एकाप्रकारे यातून बाजार समितीने आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धानाची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची कबूलीच दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)