बैल कमी झाले तरी महत्त्व कायम
By Admin | Updated: September 12, 2015 01:38 IST2015-09-12T01:38:52+5:302015-09-12T01:38:52+5:30
संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव सज्ज झाले आहेत.

बैल कमी झाले तरी महत्त्व कायम
आज पोळा : झडत्यांच्या ललकाऱ्यांत जपणार परंपरा
गोंदिया/बाराभाटी : संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव सज्ज झाले आहेत. यावर्षी पाऊस कमी आहे. अनेक भागात पिकांची परिस्थिती चांगली नाही. शेतात राबणाऱ्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पण पोळ्याचे किंवा बैलांचे महत्व मात्र ग्रामीण भागात कमी झालेले नाही.
समस्त शेतकरी बांधवाचा हा महत्वाचा सण, या निमित्ताने बैलांना सजविण्यासोबतच शेतकऱ्यांच्याही अंगावर नवीन कपडे दिसतात. पण निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या उत्साहावर यावर्षी थोडे विरजण पडले आहे. प्रत्येक वर्षी बैलजोड्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. पण बैल जरी जास्त नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा देत यावर्षी खास पोळ्याच्या झडत्या सांगून पोळा साजरा करण्याचे संकेत शेतकरी देत आहेत.
‘सांगून ठेवतो चौरंगी
बेलपत्तीच्या झाडा,
हे नमन कवडा पार्वती
हर बोला.. हर हर महादेव....
अशा अनेक झडत्यांनी ग्रामीण भागाचा पोळा सण दूमदूमणार आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या पोळ्यावर नैराश्येचे सावट आहे. गोंदियाच्या मार्केटमध्ये यावर्षी बैलांचे साज विक्रीला दिसले तरी विक्रीचे प्रमाण घटल्याचे दुकानदारांनी सांगितले.
बाराभाटी, येरंडी, देवलगाव, बोळदे, कवठा डोंगरगाव, कुंभीटोला, सुकळी, खैरी, चापटी, सुरगाव, पिंपळगाव, खांबी या गावात शेतकऱ्यांनी पोळ्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)