जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

By Admin | Updated: June 28, 2015 01:10 IST2015-06-28T01:10:18+5:302015-06-28T01:10:18+5:30

जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे,

Due to the global recession, the price of the rice falls | जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

नितीन गडकरी : शेतकऱ्यांनी पिकात बदल करण्याची सूचना
आमगाव : जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आमगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.गडकरी यांची जाहीर सभा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी झाली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.संजय पुराम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते काहीतरी आरोप करून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात गेल्या ६०-६५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. नेहरूजी, इंदिराजींच्या काळापासून आता राहुल गांधीपर्यंत सर्वजण गरीबी हटविण्याचा नारा देत आहेत. पण प्रत्यक्षात जनता तशीच आहे. नेत्यांची गरीबी मात्र दूर झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी इतक्या वर्षात जे करून ठेवले ते बदलविणे एक वर्षात शक्य नाही. मात्र आमच्या पाच वर्षाच्या काळात नक्कीच बदल दिसेल असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ७० हजार कोटींचे विमान खरेदी करण्याच्या निर्णयावरही टिका केली. तत्कालीन सरकारची निती चुकीची होती. धानाचे भाव वाढले नाही हे सुद्धा तत्कालीन सरकारच्या चुकीच्या नितीचाच परिणाम असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन, मध, मच्छोत्पादन अशा वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावे, असा सल्ला गडकरींनी दिला. (शहर प्रतिनिधी)
शिवणकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला
एकेकाळी भाजपाचे राष्ट्रीय नेता असलेले माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांना भाजपाने वाळीत टाकले आहे. त्याचे पुत्र विजय शिवणकर राष्ट्रवादीच्या तंबूत गेले आहे. आमगाव आणि शिवणकर हे भाजपासाठी एक समीकरण होते. आता ती परिस्थिती राहिली नसताना प्रथमच गडकरी आमगावात आले. त्यामुळे ते शिवणकरांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडणार नाही, असा अंदाज असताना त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा कोणताही उल्लेख भाषणात केला नाही.

Web Title: Due to the global recession, the price of the rice falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.