अतिक्रमणामुळे गावाच्या विकासात अडथळा
By Admin | Updated: May 15, 2015 00:50 IST2015-05-15T00:50:30+5:302015-05-15T00:50:30+5:30
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

अतिक्रमणामुळे गावाच्या विकासात अडथळा
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. सध्या बारव्हा गावात काही नागरिकांनी ये जा करण्याच्या मार्गावर अतिक्रमण करून रस्ते पूर्णत: गडप केले आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या निगडीत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची नेमणूक केली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व विकासकामे आदी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतला प्राधान्य आहे. मात्र या अधिकाराची जाणीव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना नसल्यामुळे या सोयी पासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. बारव्हा येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये ग्रामपंचायतच्या आबादी जागेत गरजू लोकांना मोफत घरकुल निर्माण करून देण्यात आले. त्यामध्ये १५ फुटाचे रस्ते सोडून बेघर वस्तीचे घरकुल तयार करण्यात आले. मात्र काही लोकांनी शासकीय जागेचा दुरुपयोग केला आणि या १५ फुटाचे रस्ते अतिक्रमणामुळे ५ फुटाचे शिल्लक आहेत. या सर्वसाधारण रस्त्याची रुंदी १५ फुट इतकी असते. मात्र अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी फक्त ३ ते ५ फुटापर्यंत राहिली आहे.अतिक्रमण होत असताना काही नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि वेळोवेळी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मात्र रस्ते अरुंद झाल्यामुळे बैलबंडी, ट्रॅक्टर सारखे वाहन घरापर्यंत नेता येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना लेखी पत्र देवून होत असलेल्या आणि झालेल्या अतिक्रमणाची माहिती दिली आणि कारवाईची मागणी केली. त्यानुसार खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखांदूर आणि ग्रामसेवक बारव्हा यांना संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून अतिक्रमण काढणे या संबंधाने ठराव देऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. परंतु त्यांच्या आदेशाची दखल न घेता त्यांच्या आदेशाची खिल्ली उडविली जात आहे. गावात काही रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले. सदर रस्ता हा ३ मिटर रुंद (म्हणजे १० फुट) इतका तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील अतिक्रमण काढता येत होते. परंतु प्रशासनाला गावातीलच कोणते रस्ते किती फुट रुंद आहेत हे सुद्धा माहित नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या गावाच्या विकास खुंटत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते अतिक्रमणमुक्त करून द्यावे अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)