रिमझिम पावसाने पिके बहरली
By Admin | Updated: September 9, 2014 23:34 IST2014-09-09T23:34:51+5:302014-09-09T23:34:51+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो.

रिमझिम पावसाने पिके बहरली
७९ टक्के पाऊस : दोन जलाशयातून साठ्यापेक्षा अधिक विसर्ग
गोंदिया : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ९२१.०३ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वातावरणातील या बदलामुळे काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.
यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील चार मुख्य जलाशयांपैकी पुजारीटोला व कालीसराड या दोन जलाशयातून जलसाठ्याच्या क्षमतेएवढे पाणी खरीप पीक वाचविण्यासाठी सोडण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडणे सुरूच आहे. अशीच स्थिती राहीली तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलाशय रिक्त होतील, अशी चिंता संबंधित विभागात व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाच्या जलसाठ्याची क्षमता ३१८.८५ दलघमी आहे. सिरपूर जलाशयाची १९२.५२ दलघमी, पूजारीटोलाची ४८.६९ दलघमी व कालीसराड जलाशयाची २७.७५ दलघमी जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत कालीसराडच्या डाव्या कालव्यातून ४४.९७४ एमएमक्यू व उजव्या कालव्यातून २७.०४७ एमएमक्यू पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ७२.०२१ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. याशिवाय इटियाडोह जलाशयातून ७०.६२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इटियाडोहाच्या डाव्या कालव्यातून आताही पाणी सोडले जात आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस योग्य प्रमाणात पडला नाही. त्यामुळे पूजारीटोला, कालीसराड व इटियाडोह जलाशयातून सिंचनासाठी वेळेपूर्वीच पाणी सोडावे लागले. सिंचन विभागाच्या म्हणण्यानुसार २५ आॅक्टोबरपर्यंत शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याचा शासकीय आदेश आहे. त्यानुसार आता दीड महिन्यापर्यंत पाणी सोडले जावू शकते. परंतु जलसाठा कमी झाला तर पाणी सोडण्यात समस्या उद्भवू शकते. यानंतरही कमीत कमी एक महिन्यापर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले जाईल. (प्रतिनिधी)