अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे संस्था संचालक त्रस्त
By Admin | Updated: January 5, 2015 23:07 IST2015-01-05T23:07:04+5:302015-01-05T23:07:04+5:30
सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या

अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे संस्था संचालक त्रस्त
आमगाव : सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. या कार्यालयातील भोंगळ कारभार त्वरीत थांबविण्याची मागणी अनेक संचासकांनी केली आहे.
सहकारी संस्थांचे ९७ वे घटनादुरुस्ती पोटनियम मंजूर झालेले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पोटनियमाची प्रत दिलेली नाही. त्यांच्यांकडून घटना दुरुस्ती पोट नियमांच्या प्रत करीता पाच हजार रुपयांची मागणी होत आहे. तसेच नुकतेच झालेल्या नागपूर अधिवेशनाकरीता प्रत्येक संस्थेकडून चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली. एकूण संस्थांकडून ६० हजार रुपये वसूल करण्यात आल्याची चर्चा आहे.
तसेच मजूर संस्था व पाणी वापर संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात पाणी वापर संस्थेकडून प्रत्येकी दोन हजार रुपये अशा ११ संस्थांकडून २२ हजार रुपये व तीन मजूर संस्थांकडून प्रत्येकी चार हजार प्रमाणे १२ हजार रुपये घेण्यात आल्याचे समजते. तालुक्यात ४५ विविध सेवा सहकारी संस्था आहेत. त्यांच्याकडून ९० हजार रुपये वसूल करण्यात आले.
ज्या संस्था व्यवस्थित चालू आहेत त्यांच्या अंतरीम अवसायनाचे पत्र देऊन संस्था बंद करण्यात येतील असे धमकी पत्र देणे. तसेच पुन्हा संस्था चालू करायची असेल तर प्रत्येकी तीन हजार घेऊन संस्था चालू करा असे आदेश दिले जातात. एकंदरीत सहकारी संस्था बंद करण्याचा सपाटा या कार्यालयात सुरु झाला आहे. या सहकार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सहकारी संस्थेचे पदाधिकारी संचालक व सभासद त्रासून गेले आहेत.
विशेष म्हणजे सहायक निबंधक अधिकारी एस.डी. गोस्वामी यांच्याकडे चार तालुक्यांचा कारभार आहे. त्यात आमगाव, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत सहायक अधिकारी श्रेणी दोन यांची मनमानी सुरु आहे. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे मात्र संस्था संचालक व पदाधिकाऱ्यांत चांगलाच रोष खदखदत आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)