तलाठ्यांच्या संपामुळे महसूल कामे ठप्प
By Admin | Updated: April 28, 2016 01:30 IST2016-04-28T01:30:36+5:302016-04-28T01:30:36+5:30
महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते.

तलाठ्यांच्या संपामुळे महसूल कामे ठप्प
बेमुदत संप : तलाठी साजे व महसूल मंडळाची पुनर्रचना करा
गोंदिया : महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते. रेती घाटांवरून होणाऱ्या चोरीवर प्रतिबंध घालण्याचे कामही तलाठी व मंडळ अधिकारी तहसीलदारांच्या नेतृत्वात करतात. मात्र आता तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने सर्वच कामे रखडली असून नागरिक अल्पावधीतच त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ घटक शाखा विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या नेतृत्वात आपल्या विविध मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. मात्र या संपाचा परिणाम ग्रामीण भागात शेतकरी व विद्यार्थ्यांवर पडला आहे. आता आवश्यक प्रमाणपत्रांसाठी कुठे भटकावे, अशी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. शिवाय रेतीघाटावरून रेतीची चोरी करणाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही.
अनेक रेतीघाटांवरून खुलेआम चोरी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी साजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात यावी, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देण्यात यावे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करावे (सॉफ्टवेअर दुरूस्ती, सर्व्हरची स्पीड व नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर करावे), तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देण्यात यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेच्या २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावे, तसेच अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या समस्या सोडवाव्या आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
आंदोलनाची रूपरेषा
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर संघटनेने पूर्वीच आंदोलनाची रूपरेखा ठरविली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामे केली व महसुलेतर कामे बंद ठेवली. यात संजय गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विविध विमा योजना, जात प्रमाणपत्र, जलसंधारण व एमआरईजीएस कामांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तसंवर्गास वगळावे,हसील कार्यालयासमोर दुपारी सुट्टीत निदर्शने करण्यात आली. २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. २१ एप्रिलपासून संगणीकृत कामकाजावर बहिष्कार व डीएससी तहसीलदारांकडे जमा व यानंतर २६ एप्रिलपासून तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या निर्णयानुसार बेमुदत संपावर गेले आहेत.