वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: April 5, 2017 01:02 IST2017-04-05T01:02:19+5:302017-04-05T01:02:19+5:30
वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान पिकांवर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे.

वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
केशोरी : वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान पिकांवर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी उन्हाळी धानपीक लागवडीपासूनच दर १५ दिवसांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत असून त्यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत आहे. यामुळे उन्हाळी धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
परिसरात दरवर्षीपेक्षा यंदा खासगी बोअरवेल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी इटियाडोहापासून निघणाऱ्या गाढवी नदीच्या काठावरील उन्हाळी धानपीक लावले. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन मक्याची (कडधान्य) लागवड केली. परंतु यावर्षी रोगांचा एवढा प्रादुर्भाव वाढला असून कीटनाशकाची फवारणी करूनही रोग नाहिसे होताना दिसत नाही.
खरीप हंगामापेक्षा रबी हंगामात धानपीक दोन पटीने जास्त निघतात. याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे धान पिकास पोषक वातावरण मिळते व धानाला मोठ्या प्रमाणात फुटवे निघतात. त्यामुळे उन्हाळी धानपीक पावसाळी धान पिकापेक्षा जास्त असते.
वातावरणात बदलामुळे धानपिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर ढगाळ वातावरणामुळे अनेक रोग धानपिकांवर उद्भवतात. यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिकांवर परिणाम होवून उत्पन्नात घट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)