भाजपच्या ‘विजय’मुळे अनेकांच्या आशांवर पाणी

By Admin | Updated: October 20, 2014 23:14 IST2014-10-20T23:14:30+5:302014-10-20T23:14:30+5:30

गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल लागला आणि १३ हजार ९८ मतांनी भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले निवडून आले. निकालापूर्वी कोणीही कोणाबाबत खात्रीने बोलायला तयार नव्हते.

Due to BJP's 'Vijay', water on many people | भाजपच्या ‘विजय’मुळे अनेकांच्या आशांवर पाणी

भाजपच्या ‘विजय’मुळे अनेकांच्या आशांवर पाणी

तिरोडा : गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल लागला आणि १३ हजार ९८ मतांनी भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले निवडून आले. निकालापूर्वी कोणीही कोणाबाबत खात्रीने बोलायला तयार नव्हते. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या चार प्रमुख पक्षांसह अपक्ष दिलीप बन्सोड यांनाही विजयाची मोठी आशा होती. पण भाजपच्या विजय रहांगडाले यांनी अखेर बाजी मारत सर्वांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
रहांगडाले यांना ५४ हजार १६० मते मिळाली. त्याखालोखाल अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड यांना ४१ हजार ६२ मते मिळाली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक फेरीत भाजपा आघाडी घेत असताना १६ व्या फेरीत मात्र भाजपा उमेदवाराला ५७२ मते कमी पडले होते. त्या वेळी ८२२२ मतांची आघाडी कायम होती. प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत जाऊन शेवटी १३०९८ मतांनी विजय रहांगडाले विजयी झाले.
सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन अपक्ष लढणारे दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर, शिवसेनेत उडी घेऊन गेलेले पंचम बिसेन आणि काँग्रेसचे पी.जी.कटरे यांच्या कार्यकर्त्यांना आपापल्या नेत्यांच्या विजयाची आशा होती. त्यांच्या-त्यांच्या घरासोर, कार्यालयासमोर चाहत्यांची गर्दी होती. मात्र पराजय दृष्टीपथास पडताच इतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी चुपचाप काढता पाय घेणे पसंत केले. तिरोडा विधानसभा क्षेत्रात १२१८ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला तर १२०५ मतदारांनी बॅलेट पेपरचा वापर केला. ५१ बॅलेट विविध कारणांनी रद्द झाले.
दिलीप बन्सोड सुरूवातीपासूनच पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस एक नाही तर दोन उमेदवार लढवित असल्याची सुरूवातीला चर्चा होती. निवडणुकीचे सुत्रबध्द नियोजन व कार्यकर्ते शेवटपर्यंत जोडणे यात बन्सोड यांची शैली योग्य ठरली. एक अनुसूचित जातीचे उमेदवार खुल्या गटातून निवडणूक लढत आहे अशी चर्चा होऊ लागली.
त्यामुळे जातीय मतांचे धृव्रीकरण काही प्रमाणात का होईना झालेले दिसून आले. पोवारबहुल क्षेत्रात अपक्ष व अनुसूचित जातीची व्यक्ती निवडून येईल असा अंदाज वर्तविल्या जात असताना निवडणुकीच्या आधल्या दिवशी काही प्रमाणात का होईना पोवार समाजातील काही मंडळींनी आपला एकच उमेदवार जिंकू शकतो तो म्हणजे विजय रहांगडाले आणि त्या दृष्टीने त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, असा निर्णय घेतला. लगेच फोन, वार्ता, चर्चा यातून मतदारांना रहांगडालेंकडे वळविण्यात आले. शेवटी पोस्टल बॅलेटही स्वयंस्फूतीने विजय रहांगडाले यांच्या बाजूने वळले आणि भाजपचा येथील विजय सुकर झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to BJP's 'Vijay', water on many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.