शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली देवरी नगरी
By Admin | Updated: February 20, 2016 02:36 IST2016-02-20T02:34:53+5:302016-02-20T02:36:28+5:30
राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव निमित्ताने शुक्रवारला शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने देवरी नगरी शिवरायांच्या जयघोषाने पूर्णपणे दुमदुमून गेली.

शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली देवरी नगरी
पहिल्यांदाच शोभायात्रा : अश्वारूढ छत्रपती व जिजामाता आकर्षण
देवरी : राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव निमित्ताने शुक्रवारला शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने देवरी नगरी शिवरायांच्या जयघोषाने पूर्णपणे दुमदुमून गेली.
कृष्णा सहयोगी शिक्षण संस्थेच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी १० वाजता शिवाजी संकुलातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. क्षेत्राचे आमदार संजय पुराम आणि माजी महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम, संस्थापक झामसिंग येरणे, अनिल येरणे यांनी छत्रतपती शिवाजींच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले व नंतर शोभायात्रेला सुरुवात झाली.
पांढरे वस्त्र, भगवा फेटा घालून मान्यवर तसेच शाळेतील शिक्षकवृंद विद्यार्थी तसेच गावकरी लाखोंच्या संख्येत शोभायात्रेत सामील झाले. हातत भगवा झेंडा घेऊन लेझीमच्या तालात शिवरायांचा जयघोष करीत विद्यार्थी शोभायात्रेत चालत होते. ढोल नगाऱ्यांच्या तालात देशभक्तीपर गीतांनी शहर दुमदुमून गेले.
शोभायात्रा शिवाजी संकुलातून सुरु होऊन शहरातील विविध मार्गांनी भ्रमण करीत परत शिवाजी संकुलात घेऊन पोहोचली. शहरात जागोजागी नागरिकांनी शितल जल, शरबत, बिस्कीट, नास्त्याची सोय करुन शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. यावेळी आमदार संजय पुराम व त्यांचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
शोभायात्रेकरिता कृष्णा सहयोगी शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून तयारी करीत सहयोग प्रदान केला. तसेच या शोभायात्रेला यशस्वी करण्याकरिता संस्थेचे संचालक झामसिंग येरणे व अनिल येरणे यांनी विशेष सहयोग दिले.
या शोभायात्रेत संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांनी शिवाजी महाराजांवर आधारित देखाव्यांचे प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)