शेतीपूरक व्यवसायातून खोसेटोल्यात अवतरली दूधगंगा
By Admin | Updated: October 15, 2015 02:00 IST2015-10-15T02:00:42+5:302015-10-15T02:00:42+5:30
धानाचे कोठार म्हणून ख्यातीप्राप्त गोंदिया जिल्ह्यात शेतकरी वर्षानुवर्षापासून धानाचे पारंपरिक पिक घेतात.

शेतीपूरक व्यवसायातून खोसेटोल्यात अवतरली दूधगंगा
गोंदिया : धानाचे कोठार म्हणून ख्यातीप्राप्त गोंदिया जिल्ह्यात शेतकरी वर्षानुवर्षापासून धानाचे पारंपरिक पिक घेतात. पण केवळ त्यावर अवलंबून राहिल्याने आर्थिक उन्नती साधने शक्य नसल्याचे ओळखून अनेक शेतकरी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. याचाच भाग म्हणून गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. शासनाकडून त्यांना दुधाळ गायी पुरविण्यात आल्या. आज महिन्याकाठी येथील शेतकरी ७.९२ लाखांचे उत्पन्न दुधाच्या व्यवसायातून घेत आहेत.
गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला हे १६३ उंबरठ्याचं आणि अवघ्या ८०९ लोकवस्तीचं आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती. या गावातील २९४ हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेतीचा कार्यक्रम खोसेटोल्यात प्रभावीपणे राबविण्यात आला आणि पाहता पाहता या गावाचे चित्रच बदलले. खोसेटोल्यातील ६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ८८ जर्सी आणि होस्टन जातीच्या दुधाळ गायींचे वाटप केले. गावातील बहुतांश शेतकरी खरीपाच्या हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून धान शेती करीत असल्याने त्यांचे उत्पन्नही मर्यादित होते. पण आता या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने त्यांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळून भक्कम असा आर्थिक आधार मिळाला आहे.
परिश्रम करण्याची तयारी असली की यश नक्की मिळतं, हे येथील शेतकऱ्यांनी सिद्ध करुन दाखविले. गावातील शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या नवीन व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेतले. एका गायीपासून इथला शेतकरी दोन्ही वेळेच सरासरी १५ लिटर दूध घेतो. तीन सहकारी आणि दोन खासगी अशा पाच संस्था दुध संकलनाचे काम करतात. दुधाला प्रतिलिटर २० रुपये दर या संस्था देतात. दररोज १३२० लिटर दुधाचे संकलन खोसेटोल्यात करण्यात येते. २६ हजार ४०० रुपयांचे उत्पन्न दररोज तर महिन्याकाठी ७ लक्ष ९२ हजार रुपयांचे उत्पन्न दुधापासून येथील गावकऱ्यांना मिळते. एका गायीच्या दुधापासून महिन्याकाठी ९ हजार रुपयांचे उत्पन्न होत असून चाऱ्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी ६ हजार रुपये शुद्ध नफा एका गाईपासून शेतकऱ्यांना मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गावकरी झाले व्यसनापासून दूर
खोसेटोल्यातील शेतकऱ्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायाला वाहून घेतल्यामुळे गावातील आबालवृद्ध व्यसनापासून दूर आहेत. गावात प्रवेश करतेवेळी साधी पानटपरीसुद्धा दिसत नाही. दुधाळ जनावरांच्या आहार व आरोग्याकडे खोसेटोल्यातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष आहे. कारण गायम म्हणजे कामधेनू आहे. भविष्यात येथील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यातून गावकऱ्यांची निश्चितपणे सामाजिक व आर्थिक प्रगती होणार हे दिसून येत आहे.
रासायनिक खताचा खर्च वाचला
पाळीव दुधाळ जनावरांपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होत असल्यामुळे शेतीसाठी नियमित शेणखताचा वापर होत आहे. त्यातून रासायनिक खताचा वापर फारच कमी प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे तो खर्चही वाचत आहे. शेणखताच्या वापरामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढली असून शेतजमिनीचा पोतही कायम आहे.