तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 5, 2015 01:57 IST2015-08-05T01:57:51+5:302015-08-05T01:57:51+5:30
तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती.

तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट
शेतीची कामे खोळंबली : बळीराजाच्या डोळ्यात पाणी
इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान रोवणी पासून शेतीची मशागत केली. जुलै महिन्यात पावसाने सुरवात केली परंतु शेतीला रोवणीसाठी पाहिजे तसा पाऊस आला नाही. धानाच्या खारी जगल्या परंतु अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे अजुनपर्यंत लावले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनीच रोवणी केली आहे. मात्र वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या ६५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी, पालडोंगरी, करटी-बु., करटी-खु., बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा पिपरीया, बोरा, गोंडमोहाळी या गावात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. या भागात पावसाळा लागला तेव्हा पासून बांध्यामध्ये साचेल असा पाऊस आलाच नाही. जुन-जुलै महिना संपला आॅगस्ट महिना लागला तरी पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात बरसलेला नाही. पाऊस कधी बसरणार याची वाट शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या कमीपणामुळे हलक्या प्रतीच्या धानाची पेरणी केली आहे. त्या धानाची रोवणी आज घडीला झाली पाहिजे होती. परंतु पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आला नाही तर हलके धान होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाऊस नसल्यामुळे धानाच्या खारी लाल झाल्या व मरणाच्या अवस्थेत आहेत. १५ आॅगस्ट पर्यंत धानाच्या रोवण्या झाल्या पाहिजे, तेव्हाच धानाचे पीक होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आॅगस्टचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असूनही पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवण्यांना घेऊन संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे रोवणी न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर रोवणी झालेल्यांना आता रोवणी जगावी यासाठी पाण्याची गरज आहे. एकंदर ईकडे आड व तिकडे विहीर अशी पंचाईत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)