वाळू तस्करीवर ड्रोन वॉच

By Admin | Updated: June 17, 2016 02:01 IST2016-06-17T02:01:21+5:302016-06-17T02:01:21+5:30

जिल्ह्यातील रेतीघाटावरून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी

Drone watch on sand smuggled | वाळू तस्करीवर ड्रोन वॉच

वाळू तस्करीवर ड्रोन वॉच

हवाई टेहळणी : विकास कामांची प्रगती व गुणवत्ताही तपासणार
गोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटावरून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी आता ड्रोन या उपकरणाचा वापर केला जाणार आहे. त्याची चाचणीही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनीही ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाची पाहणी करून हे उपकरण विविध कामांवर नजर ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल, असा अभिप्राय व्यक्त केला.
जिल्ह्यात वैनगंगा, वाघ, चुलबंद आणि शशीकिरण नदीतील रेतीघाटाचा दरवर्षी ई-लिलाव करु न रेतीची विक्री केली जाते. या रेती विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. परंतू या रेतीघाटावरून दिवसा आणि रात्रीला मोठ्या प्रमाणात वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी (चोरी) होते. परिणामी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. यावर उपाय म्हणून आता जिल्हयातील रेतीघाटांवर ड्रोनद्वारे हवाई टेहळणी करण्यात येणार आहे. जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या विविध योजनांची ड्रोनद्वारे हवाई पाहणी करण्यात येणार आहे. यामधून योजनांची प्रगती, गुणवत्ता हे सुध्दा बघावयास मिळणार आहे. विशेषत: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियानासह अन्य कामांचे फोटो व चित्रीकरण उपलब्ध होणार असून वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांना बसल्या ठिकाणीच विकास कामाची प्रगती व गुणवत्ता दिसून येण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले दि.१३ ला जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे विविध विकास कामे कशा प्रकारे दिसू शकतात याचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी पालकमंत्र्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन समितीच्या सभापती छाया दसरे, सडक/अर्जुनी, सालेकसा, अर्जुनी/मोरगांव, गोरेगांव येथील पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा खनिकर्म अधिकारी भीमराव फुलेकर प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

वाळू चोरट्यांना
स्पष्टपणे टिपणार
या टेहळणीत होत असलेल्या रेती चोरीचे फोटो काढण्यात येणार आहे. तसेच चित्रीकरण सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या ट्रॅक्टरमधून रेती चोरी होत आहे तो ट्रॅक्टर व चोरी करणारे व्यक्ती स्पष्ट दिसणार आहे. यातून रेती चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास ड्रोन हे हवाई उपकरण सहाय्यभूत ठरणार आहे.

Web Title: Drone watch on sand smuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.