चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:04 IST2017-10-19T00:03:15+5:302017-10-19T00:04:08+5:30

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. अशात मात्र चारचाकी वाहनांमुळे बाजारातील ठिकठिकाणी ट्राफीक जामचे चित्र आहे.

Driving traffic due to four wheelers | चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

ठळक मुद्देबाजारात होते ट्राफीक जाम : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. अशात मात्र चारचाकी वाहनांमुळे बाजारातील ठिकठिकाणी ट्राफीक जामचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत असून चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसच दिसत नसल्याने त्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरिकांना अधिकच त्रास होत आहे.
बाजारातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यात आता दिवाळीच्या खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे. बहुतांश नागरिक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी बाजारात येत असल्याने त्यांची वाहनेही दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. अशात रस्ते अधिकच अरूंद होत असून उरलेल्या जागेतूनच वाहतूक करावी लागते. यात दुचांकीचे तर ठीक आहे मात्र एखादे चारचाकी वाहन बाजारात शिरल्यास पूर्ण रस्ताच घेरला जातो व त्यानंतर वाहतुकीची गोची होते.
आजघडीला दररोज हे प्रकार घडत असून ट्राफीक जामच्या या समस्येमुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. वाहतुकीच्या कोंडीकडे बघता आता बाजारात गाडी घेऊन येणे नागरिकांना डोकेदुखी वाटू लागले आहे. आणि यासाठी कारणीभूत मात्र चारचाकी वाहनांचा बाजारात प्रवेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बाजारातील सध्याची गर्दी बघता चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी करण्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
वाहतूक पोलिसांची दुचाकींवर कारवाई
बाजारात एखादी दुचाकी रस्त्याच्या कडेला जरी उभी दिसली, तरी वाहतूक पोलिसांकडून चालान फाडले जात असल्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत. एखादी दुचाकी उभी असली तरी तिच्यापासून जेवढा त्रास होत नसतो तेवढा त्रास मात्र एका चारचाकीमुळे होतो व हे चित्र उघड आहे. तरीही वाहतूक पोलीस चारचाकीवाल्यांना सोडून दुचाकीवाल्यांवरच चालानची कारवाई करीत आहे.

Web Title: Driving traffic due to four wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.