शहरातील पेयजल व्यवस्था ठरली नाममात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST2021-04-06T04:27:56+5:302021-04-06T04:27:56+5:30
गोरेगाव : नगरपंचायतीचे शहरातील पेयजल व्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागातील आरओ यंत्र व हातपंप नादुरुस्त आहेत. परिणामी नागरिकांना तसेच प्रवाशांना ...

शहरातील पेयजल व्यवस्था ठरली नाममात्र
गोरेगाव : नगरपंचायतीचे शहरातील पेयजल व्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागातील आरओ यंत्र व हातपंप नादुरुस्त आहेत. परिणामी नागरिकांना तसेच प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांनी आता पाण्याची बाॅटल विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.
मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली असून, पारा ४१ अंशांवर गेला आहे. प्रभाग क्रमांक-१ श्रीरामपूर (पुनर्वसन) येथे दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत असल्याने टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. नगरपंचायतीमध्ये प्रशासक बसल्याने आरओ देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना याचा फटका बसत आहे. प्रवाशांना आपली तहान भागविण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते आहे. सार्वजनिक ठिकाणी व मुख्य चौकात पाणपोई लावण्याचे धाडस कोणत्याही सामाजिक संघटनेने केल्याचे दिसून येत नाही. शहरातील नवीन बसस्थानक, दुर्गा चौक, जुने बसस्थानक, बँकांसमोर, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ठाणा रोड चौक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने तत्काळ आरओ यंत्र, हातपंपांची दुरूस्ती व सार्वजनिक विहिरींची सफाई व श्रीरामपूर येथे पाणी टँकरची आवश्यकता असल्यास टँकर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.