भाजपने केले जनतेचे स्वप्न साकार

By Admin | Updated: November 16, 2015 01:48 IST2015-11-16T01:48:22+5:302015-11-16T01:48:22+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षात सरकारने लोककल्याणकारी निर्णय व योजनांद्वारे राज्याचा विकास साधला आहे.

The dreams of the BJP made the people come true | भाजपने केले जनतेचे स्वप्न साकार

भाजपने केले जनतेचे स्वप्न साकार

अनिल सोले यांचे प्रतिपादन : वर्षपूर्तीनिमित्त भाजपची लोकसंवाद बैठक
गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षात सरकारने लोककल्याणकारी निर्णय व योजनांद्वारे राज्याचा विकास साधला आहे. शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडविण्यात यश मिळविले, असे मत आ. अनिल सोले यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान, विजेचे प्रश्न, वस्त्रोद्योग धोरण, मेक इन महाराष्ट्र, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, लंडन येथील वास्तुखरेदी, एलबीटी रद्द करणे, धानाला बोनस, सेवा हमी कायदा, मालगुजारी तलावांचे खोलीकरण, शिक्षण संदर्भातील निर्णय आदी अनेक निर्णयामुळे सरकारने जनतेचे स्वप्न साकारण्याचे कार्य केले, असे ते म्हणाले.
मयूर लॉन येथे झालेल्या भाजप लोकसंवाद जिल्हा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. बैठकीला प्रामुख्याने पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. दयाराम कापगते, माजी आ. हरीश मोरे, माजी आ. खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते.
आ. सोले पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाच्या माध्यमातून अनेक राज्यमार्गांना राष्ट्रीय मार्ग करण्याचे धोरण अवलंबिले असून कार्य सुरू केले आहे. रेल्वेचे अनेक वर्षापासूनचे थांबलेले ब्रॉडगेजचे काम द्रुतगतीने सुरू झाले आहे. ज्या समस्या मागील १५ वर्षांत आघाडी सरकारने निर्माण करून ठेवल्या होत्या, त्या सोडविण्याचे काम भाजप सरकारने अल्पावधीतच केले आहे. राज्याचे दोन लाख कोटींचे बजेट असून तीन लाख कोटींच्या वर कर्ज असताना सरकारने अशा बिकट परिस्थितीत राज्याला सावरण्याचे कार्य केले आहे.
सावकारी कर्जापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कृषिपंप, जलयुक्त शिवार आदी शेतकरी हिताचे धोरण राबविल्याने राज्य विकासाच्या प्रवाहात आले आहे. गरिबांना घर, स्वच्छता मोहीम, आदर्श गाव संकल्पनेमुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे कार्य सरकार करीत आहे. कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रत्येक योजना व त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रत्येक बूथस्तरावर लोकसंवाद कार्यक्रमातून सांगण्याचे आवाहन केले. नगर पंचायत निवडणुकीत विजयी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष भरत क्षत्रीय, नंदकुमार बिसेन, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, प्रमोद संगीडवार, चतुर्भूज बिसेन, बाबा लिल्हारे, सर्व जि.प. सदस्य, नगरसेवक, पं.स. सदस्य जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
आ. विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील अनेक समस्या शासनस्तरावर सोडविण्यात आल्याची माहिती दिली. तर आ. संजय पुराम यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, जिल्ह्यात व राज्यात सरकारच्या कामातून निश्चितच विकास होत असल्याचे जनतेला दिसून आले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाकरिता अनेक कल्याणकारी कार्य सुरू आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व निर्णयांची माहिती पोहोचविण्याचे कार्य करावे, असे मत व्यक्त केले.

Web Title: The dreams of the BJP made the people come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.