विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:59+5:302021-04-24T04:28:59+5:30
आमगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध घातले. सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरायला बंदी घातली. ...

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस
आमगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध घातले. सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरायला बंदी घातली. मात्र, तरीही आमगावकरांनी घराबाहेर पडणे न थांबविल्याने पोलिसांनी नाकाबंदीचा डाेस देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच कोरोना चाचणीही केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सायंकाळी तळ ठोकला. प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करीत विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. सोबतच कोरोनाची रॅपिड तपासणी करण्यात आली. या नाकाबंदीत होणाऱ्या चौकशीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची व वाहनांची चांगलीच कोंडी झाल्याचेही दिले. राज्यासह शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू असली, तरी आमगाववासी बिनधास्त शहरात फिरताना दिसतात. सुरुवातीला पोलिसांनी सौम्य भूमिका घेत केवळ चौकशी करून नागरिकांना सोडले. पण,कारवाईतून मोकळीक मिळाल्याचा गैरफायदा घेणाऱ्या नागरिकांना आता चाप लावण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे क्षुल्लक कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. ज्या ठिकाणी एका व्यक्तीचे काम आहे, त्या ठिकाणी दोघे-चौघे जात आहेत. हा मुक्त संचार रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. शहरातल्या प्रमुख चौकात पोलिसांचा फौजफाटा जमला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी ये-जा करणाऱ्या प्रत्येकांची चौकशी केली. पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांमुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल हे नक्कीच.