घरपोच सिलिंडरचे वजन करता का?
By Admin | Updated: May 30, 2015 01:23 IST2015-05-30T01:23:11+5:302015-05-30T01:23:11+5:30
स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत़..

घरपोच सिलिंडरचे वजन करता का?
गोंदिया : स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत़ गॅस घरपोहोच करणारा कर्मचारी भरलेल्या सिलिंडरमधून बेमालूमपणे गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याचा प्रकार अनेकदा उघड झाला आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून तसेच वाहनात भरून जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही शहरात समोर आले आहेत़ त्यामुळे कमी वजनाचा गॅस आपल्या माथी मारून एजंटने फसवणूक केल्याची नागरिकांची भावना झाली आहे़ अगोदरच महागाई त्यात अशा प्रकाराने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत़
सिलिंडर चोरीत वाढ
सध्या शहरात घरफोडीत मौल्यवान चीजवस्तूंबरोबर गॅस सिलिंडर चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. भुरट्या चोरासांठी अशा चोऱ्या सहज व पैसा मिळवून देणाऱ्या ठरत असल्याने सिलिंडर चोरीला जाण्याच्या घटना घडतात. घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये सोने, चांदी, मोबाइल हे चोरण्याबरोबरच आता चोरट्यांनी सिलिंडर लंपास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गॅसच्या किमती वाढल्यापासून या प्रकारच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सिलिंडर चोरीला जाण्याच्या घटनांची मोठ्या संख्येने नोंद होत आहेत. चोरलेले सिलिंडर गॅसवर चालणाऱ्या गाड्यांना एक हजार रुपये किमतीना विकले जातात. त्याचप्रमाणे भंगारात अथवा कमी किमतीला ओळखीच्या ठिकाणी विकली जातात. सध्या गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती व उपलब्धतेच्या कमतरतेमुळे अशा चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राथमिक पातळीवर पाहता या चोरीने मोठा फरक पडल्याचे दिसून येत नसले तरी अशा चोऱ्यांमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे़
घरगुती सिलिंडरमधून चोरी
शहरातील ग्राहकांना घरपोच सिलिंडरची सेवा देणाऱ्या एका गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आला आहे. त्यांच्याकडून भरलेले व रिकामे असे सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामुळे गॅस एजन्सी व तेथील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते, हे उघड झाले आहे. सुरुवातीला ज्यादा दराने सिलिंडरची विक्री व आता थेट भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची चोरी केली जात असल्याचे प्रकार सुरू असल्याने सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची ओरड ग्राहकांकडून केली जात असतानाच हे प्रकार उघडकीस आले आहेत़
एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारात?
अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. घरगुती सिलिंडर व्यावसायिकांना विकून पैसा कमाविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. अशा वेळी एजन्सीवाले काय करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उलट काही एजन्सीवाले गॅसच्या काळ्याबाजारात सहभागी होऊन नफेखोरी करतात, असे आरोप ग्राहकांकडून केले जात आहेत. पुरवठा विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नाही. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरूच आहे. सर्वच गॅसच्या एजन्सीज त्यात सहभागी नाहीत. काही चांगल्या पद्धतीने काम करून ग्राहकांना नियमित व वेळेवर गॅसचा पुरवठा करतात, पण त्यांची संख्या कमी आहे. गॅसचा हा काळाबाजार वाढला असला तरी गॅसचा होणारा अनधिकृत वापर हा तर काळ्याबाजारापेक्षाही धोकेदायक बनू लागला आहे. गॅसचा वाहनांसाठी होणारा व्यापार अत्यंत घातक बनू लागला आहे. अनेकदा या गॅसच्या वापरामुळे वाहनांचा स्फोट होऊन अपघात झाले आहेत.
सिलिंडर दरात फ सवणूक
गॅस संपला तर लगेच मिळायला हवा, परंतु अनेकदा तो दिला जात नाही. मात्र, दुसरीकडे गॅस सिलिंडर काळ्याबाजारात राजरोस विकला जातो. यामुळे तुटवडा निर्माण होतो. घरगुती विनाअनुदानित गॅससाठी ४७0 रु पये घेतले जातात. घरगुती गॅसचे वजन १४़६ किलो असते, परंतु अनेकदा तो कमी भरतो. काही टोळ्या हा गॅस काढून घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर देताना त्याचे वजन करून दिले पाहिजे, पण किती एजन्सीज हा नियम पाळतात, हा प्रश्न आहे़