‘सारस फेस्टीवल’चा कागदोपत्री शुभारंभ
By Admin | Updated: December 16, 2015 01:59 IST2015-12-16T01:59:30+5:302015-12-16T01:59:30+5:30
जिल्ह्याला लाभलेल्या निसर्ग व विविध वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासह पर्यटनाला वाव मिळावा या उद्देशातून

‘सारस फेस्टीवल’चा कागदोपत्री शुभारंभ
गोंदिया : जिल्ह्याला लाभलेल्या निसर्ग व विविध वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासह पर्यटनाला वाव मिळावा या उद्देशातून आयोजित ‘सारस फेस्टीवल’चा शुभारंभ मंगळवारी (दि.१५) झाला. मात्र रितसर उद्घाटन कार्यक्रम दि.२० ला होणार आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत आयोजित या उत्सवात राष्ट्रीय फोटोशूट स्पर्धेसह अन्य स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात वन्यजीवांचे बस्तान असून देश व विदेशातील पक्ष्यांचेही येथे आवागमन होते. गौरवाची बाब म्हणजे, ‘सारस’ हा पक्षी राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. एकंदर निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या या जिल्ह्यातील पर्यटनाला वाव मिळावा, राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी, तसेच येथील पर्यटनाला वाव मिळण्यासाठी सारसांचे संवर्धन होऊन त्यातून रोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाची धडपड सुरू आहे.
सारस या दुर्मिळ पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी ‘सारस फेस्टीवल’ही संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पर्यटन समितीकडून या ‘सारस फेस्टीवल’चे आयोजन १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या काळात करण्यात आले आहे. देशी-विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्यानेच या काळातच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हे विशेष. (शहर प्रतिनिधी)
सायकल रॅली, वॉल पेंटिंग व पोस्टर स्पर्धा
‘सारस फेस्टीवल’दरम्यान रावणवाडी ते पसरवाडा या मार्गावर विद्यार्थी, वन, पक्षी व निसर्ग प्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांची रॅली काढली जाणार आहे. तसेच वॉल पेंटींग स्पर्धेत येथील केटीएस रूग्णालय, नवीन उड्डाणपूल व सारस पक्षाचे वस्तीस्थान असलेल्या ग्राम परसवाडा येथे घरांच्या भिंतींवर सारस, वन्यजीव व निसर्ग या विषयावर स्पर्धा घेतली जाणार आहे. पोस्टर स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांकडून याच विषयावर पोस्टर बनवून घेतले जाणार आहेत. याशिवाय स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये नवेगाव, नागझीरा व परसवाडा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून प्लेन फ्लेक्सवर स्वाक्षरी व त्यांच्या सूचना नोंदवून घेतल्या जातील. शाळा व महाविद्यालयांत कार्यशाळा घेऊन वन्यजीव, सारस व निसर्ग संरक्षण व संवर्धनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘सारस मित्र’ पुरस्कार देणार
जिल्ह्यातील ग्राम परसवाडा, झिलमीलीस घाटटेमनी यासह अन्य काही गावांत सारस आढळतो. सारसच्या संरक्षण व संवर्धनासाठी येथील काही शेतकऱ्याकंडून सारस संवर्धनासाठी कार्यरत संस्था व पे्रमींकडून सहकार्य केले जात आहे. त्या शेतकऱ्यांना या उत्सवादरम्यान ‘सारस मित्र’पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या माध्यमातून आणखीही शेतकरी पुढे यावेत व सारस संवर्धनात ते सहभागी व्हावेत हा यामागचा हेतू आहे.
कार्यक्रमाला नियोजनशून्यतेचा फटका
जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय स्तरावरील एवढा कार्यक्रम आयोजित करणे हे स्तुत्य असले तरीही यत नियोजनशून्यता दिसून येत आहे. मंगळवारपासून (दि.१५) ‘सारस फेस्टीवल’चा शुभारंभ झाला असला तरीही गोंदिया शहरात किंवा जिल्ह्यात यासंबंधी एकही होर्डींग लागले नाही. यातील कार्यक्रमांची माहिती होण्यासाठी वृत्तपत्रात जाहीरातीच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधणे तर दूर, साधी बातमीसुद्धा प्रसारित करण्यात आली नाही. त्यामुळे सामान्य नागरिक या फेस्टिव्हलपासून अनभिज्ञ आहेत.
दुसरे असे की, उत्सवाचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उत्सव १५ पासून सुरू होत असताना उद्घाटन पाच दिवस उशीरा का? ही बाब आश्चर्यजनक आहे. या उत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरीही त्यांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सारस फेस्टिव्हलचा उद्देश जरी चांगला असला तरी प्रत्यक्ष हा उत्सव कागदावरच मर्यादित राहणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.