डॉक्टरांना वेळेचे भान नाही
By Admin | Updated: May 3, 2017 01:00 IST2017-05-03T01:00:51+5:302017-05-03T01:00:51+5:30
ग्रामीण रूग्णालयात कार्यरत डॉक्टरांना ठरवून दिलेल्या वेळेचे भान पाळून रूग्णांना सेवा देणे बंधनकारक व अपेक्षित आहे.

डॉक्टरांना वेळेचे भान नाही
ग्रामीण रूगाणालयातील प्रकार :नागरिकांकडून कारवाईची मागणी
सौंदड : ग्रामीण रूग्णालयात कार्यरत डॉक्टरांना ठरवून दिलेल्या वेळेचे भान पाळून रूग्णांना सेवा देणे बंधनकारक व अपेक्षित आहे. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर आपल्या मर्जीने रूग्णालयात ये-जा करतात. यामुळे मात्र रूग्णांना सकाळपासून रूग्णालयात आपला नंबर लावून ताटकळत बसावे लागत आहे. या प्रकाराकडे लक्ष देत जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होत आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरीक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहेत. आपला नंबर लवकर लागावा यासाठी रूग्ण सकाळपासूनच रूग्णालयात रांगा लावत आहेत. रूग्णालयात डॉक्टरांची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंतची आहे. तशी पाटीही रूग्णालयात लावण्यात आली आहे. मात्र येथे कार्यरत डॉक्टर गिरीश कापगते आपल्या मर्जीने येतात.
विशेष म्हणजे, रूग्णालयातील डॉक्टर्सचे पद रिक्त असल्याने त्यांच्यावरच कामाचा बोजा आला आहे. शिवाय ते कंत्राटी त्तवावर काम करीत असून बाहेरगावाहून येतात. यामुळे ते वेळेचे बंधन पाळत नाही व यामुळे मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर रूग्णालयातील कर्मचारीही रूग्णांशी अरेरावीच्या भाषेत वागत असल्याचेही बोलले जात आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने कित्येकांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागत आहे.
रूग्णालयात डॉक्टर नाहीत, पुरेसा औषधसाठा नाही, कर्मचाऱ्यांची अरेरावी यासर्व प्रकारांमुळे येथील रूग्णालय रूग्णांना सेवा देण्यात कुचकामी पडत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे या प्रकारांकडे लक्ष देत जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी भूपेंद्र साखरे, अंकूर राऊत, केवळराम इरले, जोधरू टेंभूर्णे, ज्योती टेंभूर्णे, भास्कर डोंगरवार, संतोष बनकर, चून्नीलाल साखरे, कैलाश ठाकरे, शुभांगी इरले, हंसा राऊत, मंगेश सुर्यवंशी, घनश्याम पातोडे, परसराम कुरसूंगे, राजरत्न मेश्राम, अभिमन्यू उप्रीकर, रमेश नगरकर, रामलाल तरोणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)