‘वोट नाही तर नोट परत करा’

By Admin | Updated: November 6, 2015 02:57 IST2015-11-06T02:57:11+5:302015-11-06T02:57:11+5:30

नगर पंचायतच्या निवडणुकांचे निकाल काहीसे अनपेक्षित लागल्यामुळे आणि त्यात कोट्यवधी रुपयांची

'Do not vote but reverse the note' | ‘वोट नाही तर नोट परत करा’

‘वोट नाही तर नोट परत करा’

सडक-अर्जुनी :नगर पंचायतच्या निवडणुकांचे निकाल काहीसे अनपेक्षित लागल्यामुळे आणि त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने अनेक पराभूत उमेदवारांना धक्का बसला आहे. तुम्ही मत दिले नाही ना, मग दिलेले पैसे परत करा, असा पवित्रा घेत काही पराभूत उमेदवारांनी मतदारांकडून पैसे परत मागायला सुरूवात केली आहे. त्यात जवळपास पाच लाख रुपये वसुलही करण्यात आले. वाढत्या दबावामुळे काही मतदार स्वत:हून पैसे परत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सडक-अर्जुनी नगर पंचायतमध्ये १७ प्रभाग असून या प्रभागांकरीता ८१ उमेदवार रिंगणात उभे होते. प्रत्येक प्रभागात जवळपास ४ उमेदवार उभे होते. मतदार संख्या कमी असलेले प्रभाग यावेळी जास्त होते. कोण्या प्रभागामध्ये १०० मतदार तर कुठे १५० अशी स्थिती होती. त्यामुळे निवडणूक येण्यासाठी ५० मतांचे गणित जोडावे लागत होते. त्याकरिता आपल्या जवळची १० ते १५ मते तर विकत घ्यायची ३० ते ३५ मते म्हणून बहुतांश प्रभागामधून ३० ते ३५ मते खरेदी करण्याची स्पर्धा होती. एका मताची किंमत जवळपास ५ हजार रुपये लावण्यात आली. मताकरिता २० ते २५ हजार रुपये मतदार घेवू लागले. एका पक्षाकडून २० ते २५ हजार रुपये याप्रमाणे काही मतदारांनी चारही पक्षांकडून पैसे वसूल केले. ४ मतांकरिता जवळपास ६० ते ७० हजार रुपये वाटप करण्यात आले. परंतु मतदार मात्र एकालाच मिळाले.
सडक-अर्जुनी नगर पंचायत निवडणुकीत ८१ उमेदवार उभे होते. त्यापैकी ६४ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पराभव झालेल्या उमेदवारांनी आपण किती पैसे वाटले आणि आपल्याला किती मतदान झाले, आपल्याला किती मतदान व्हायला पाहिजे होते यावरून समीकरणे मांडायला सुरूवात केली. पैसे चारही उमेदवारांकडून घेऊन मतदान फक्त एका उमेदवाराला देण्यात आले.
प्रभाग लहन असल्यामुळे आपल्याला कोणी पैसे घेऊन मतदान केले नाही हे उमेदवारांच्या लक्षात आल्यामुळे पराजय झालेल्या उमेदवारांनी आपली संघटना करून कोणी कोणी किती पैसे कुणाला दिले याची एक यादी तयार करून सर्व उमेदवार त्यांच्या घरी जायला लागले. चारपैकी कुणाला मतदान केले हे विचारू लागले. अमोरासमोर असलेल्या उमेदवाराचे एकच नाव मतदार घेवू लागले. त्यामुळे तिघांचे पैसे परत कर म्हणून पैसे परत घेऊ लागले.
एका प्रभागात दिड लाख रुपये खर्च केलेल्या उमेदवाराला फक्त २ मते पडली. त्यामुळे मतदारांनी फक्त उमेदवारांची लूट केली असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी एकी करून पैसे परत अभियान सुरू केले.
दि.३ रोजी सडक-अर्जुनीमध्ये बरेच वातावरण खराब झाले होते. वेळीच पोलिसांनी दखल घेऊन बंदोबस्त वाढविला. नियंत्रणाबाहेर चाललेली परिस्थिती कशीबशी नियंत्रणात आणण्यात आली.
एकूण ३२४४ मते १७ उमेदवारांना मिळाली त्यामुळे करोडो रुपये खर्च केलेल्या उमेदवारांनी आक्रमण पवित्रा घेतल्यामुळ्य अनेक मतदारांनी भितीमुळे उमेदवारांना पैसे परत करायला सुरूवात झाली होती. आपल्याकडे कोणी पैसे मागायला येवू नये म्हणून (दि.४) रोजी अनेक मतदारांनी स्वमर्जीने पैसे परत केले. पण पैसे अनेकांकडून घेऊन मतदान एकालाच दिले, अशा इतर उमेदवाराचे पैसे वसूल होत आहे. नगर पंचायतच्या निवडणुका अगदी दिवाळी सणासमोर आल्यामुळे मतदानासाठी मिळालेल्या पैसामध्ये मतदाराकडून सोने, मोबाईल, कपडे यांची दोन दिवसात विक्री खरेदी-विक्री झाल्याचे प्रथमच सडक-अर्जुनी येथे दिसून आले.
मतदानासाठी दिलेले पैसे परत मागणे बरोबर नाही, आम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो नाही त्यांना मतदानाची गरज होती. त्यामुळे उमेदवारांनी आम्हाला जबरदस्तीने पैसे दिले आणि आता आमचा अपमान करून पैसे मागण्यात येत आहे. हे चुकीचे आहे अशी भावना मतदार व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

पराभूत उमेदवार म्हणतात..
४मतदारांनी सर्वच उमेदवाराकडून पैसे घेणे योग्य नाही. अशा वागन्याने मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडायला लागला आहे. पैसे घेवून मतदान केल्यामुळे चांगले उमेदवार निवडून येत नाही. तसेच पुढच्या वेळी पैसे घेऊन मतदान करणे नागरिक विसरतील. त्यामुळे पैसे वसुली मोहीम फारच आवश्यक आहे. त्यांंना धडा शिकविणे गरजेचे आहे, असे मत पराजय झालेल्या आणि वसुलीला जोरात लागलेल्या एका उमेदवाराने व्यक्त केले.
उमेदवार-मतदारांना धडा
४सडक अर्जुनीमध्ये प्रथमच नगर पंचायतची निवडणूक झाली आणि त्यामध्ये अमाप पैसा खर्च करण्यात आला. परंतु पैसे घेऊन मतदान करू नये हा धडा देखील मतदारांना मिळाला आहे.

Web Title: 'Do not vote but reverse the note'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.