शहिदांना जातीव्यवस्थेत मर्यादित ठेवू नका
By Admin | Updated: March 25, 2017 01:45 IST2017-03-25T01:45:59+5:302017-03-25T01:45:59+5:30
देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये.

शहिदांना जातीव्यवस्थेत मर्यादित ठेवू नका
पोवारीटोला येथे बलिदानदिन : भेरसिंह नागपुरे म्हणाले, शहिदांचे कार्य चिरकाल स्मरणात राहणारे
सालेकसा : देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना जातीपुरते मर्यादित ठेवून त्यांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करू नये. शहिदांनी आपले सर्वस्व त्यागून देश व नागरिकांचा त्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. त्यामुळे समाज व जातीव्यवस्थेच्या पलिकडे विचार करून त्यांच्याप्रती आदर व सन्मान ठेवावे, असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केले.
सन १८५७ च्या प्रथम स्वातंत्र संग्राम सेनानी विरांगना अवंतीबाई लोधी यांची पुण्यतिथी पोवारीटोला (कोटजंभुरा) येथे त्यांच्या पुतळ्यासमोर पार पडली. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त नागरिकांना ते संबोधित करीत होते.
अध्यक्षस्थानी यादनलाल बनोठे होते. उद्घाटन माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी केले. अतिथी म्हणून खेमराज लिल्हारे, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, अॅड.वाय.एच. उपराडे, छाया वल्हारे, लोधी शक्ती संघटनेचे सचिव दयालदास डहारे, सरपंच मनिषा नागपुरे, उपसरपंच हेमराज सुलाखे, ज्ञानीराम दमाहे, प्राचार्य डी.आर. माहुले, मधुकर दमाहे, लीला नागपुरे, पुनाराम मोहारे, आडकूदास माहुले, उपसरपंच ममता गौतम व इतर मान्यवर उपस्थित होते.
पोवारीटोला येथे तालुक्यातील एकमात्र अवंतीबाई यांचा अश्वारोही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या बलिदान दिनी उपस्थित पाहुण्यांनी त्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण केले व आदरांजली वाहिली. याप्रसंगी लोधी समाजासह इतर समाजबांधवांनीसुद्धा पुष्पांजली अर्पित केली. समाजाचे कार्यकर्ते कारूलाल नागपुरे यांची समर्पन भावना व स्वकृत्यामुळे पोवारीटोला येथे अवंतीबाईचा पुतळा साकार झाला.
भेरसिंह नागपुरे पुढे म्हणाले, शहीद राणी अवंतीबाई लोधी समाजाच्या होत्या तरी त्यांनी राणी असताना रामगढचे शासन चालविताना सर्व समाजासाठी लोककल्याणाचे कार्य केले. राज्याला इंग्रजाच्या गुलामगिरीपासून दूर ठेवण्यासाठी इंग्रजाशी मरेपर्यंत संघर्ष केला, परंतु गुलामगिरी पत्करली नाही. त्यांनी केलेले कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत, असे ते म्हणाले.
या वेळी यादनलाल बनोटे यांनी, शहिदांचे कार्य चिरकाल आठवणी ठेवणारे असतात, असे सांगितले. लोधी शक्ती संघटनचे जिल्हा अध्यक्ष अॅड. येशुलाल उपराडे यांनी अवंतीबाई यांच्या विविध ऐतिहासीक कामगिरीवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक किशोर नागपुरे यांनी मांडले. संचालन विजय मानकर यांनी केले. आभार डी.आर. माहुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी कारूलाल नागपुरे, मुलचंद नागपुरे, डोमनलाल नागपुरे, अजित नागपुरे, किशोर नागपुरे, धनराज नागपुरे, अजय नागपुरे, गोरेलाल सोनवाने, सेवंती नागपुरे, कमला पालेवार, सुरेश पंधरे, मुकेश दमाहे आदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)