आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका

By Admin | Updated: March 1, 2015 01:11 IST2015-03-01T01:11:03+5:302015-03-01T01:11:03+5:30

देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाक आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता ...

Do not ignore health | आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका

आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका

गोंदिया : देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाक आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत शारदा राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महिला आरोग्य अभियान पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून दंत शल्यचिकित्सक डॉ. अंशू सैनी, डॉ. दीपक बहेकार, लायंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल, प्रा. सविता बेदरकर, प्रा. माधूरी नासरे, डॉ. सीमा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाल्या, श्रमाची कामे मोठ्या प्रमाणात स्त्रीया करतात. कुटुंबाची महत्वपुर्ण जबाबदारिही महिला यशस्वीपणे सांभाळतात. हे सर्व करीत असताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा असलेल्या स्त्रीया या आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने महिला आरोग्य अभियानातून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले आहे. शासनाचे हे अभियान कौतुकास्पद असून जिल्ह्यातील महिलांनी या अभियानाचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धकाते यांनी, जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्याप्रकारच्या आरोग्यसेवा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. शासनाच्या आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. कोबाल्ट युनिट जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे सांगत, या युनिटमुळे जिल्ह्यातील कर्करुग्णांना भविष्यात जिल्ह्यातच उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला आरोग्य अभियानामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अंशू सैनी यांनी, आजची स्त्री कामाच्या व्यस्ततेमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणात अ‍ॅनिमीया होतो. देशातील ८५ टक्के स्त्रीया अ‍ॅनिमीयाग्रस्त असल्याचे सांगत, महिलांनी आरोग्य अभियानादरम्यान आरोग्य तपासणी करुन आरोग्याची काळजी घ्यावी व निरोगी राहावे असे आवाहन केले.प्रा. बेदरकर यांनी, देशातील स्त्री जर सक्षम असेल तर तो देश प्रगती करतो. स्त्रीयांनी सुदृढ असले पाहिजे. ती आजारी पडणारच नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. स्त्री सुदृढ असली तर जन्माला येणारा बालक सुदृढ असतो. प्रत्येक स्त्रीने आपण आरोग्यसंपन्न कसे राहू याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
डॉ. बहेकार यांनी, स्त्री-पुरुष भेदीभाव मिटला पाहिजे, आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चांगले काम करीत आहेत. मुलगी ही दोन्ही घरचा उद्धार करीत असल्यामुळे तिच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे. केवळ कायद्याच्या उपयोगातून हे होणार नाही तर त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. महिलांनी निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
प्रा. नासरे यांनी, महिला आरोग्य अभियानासारख्या कार्यक्रमातून महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. महिलांनी आरोग्याची काळजी घेताना रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा दूर ठेवाव्यात असे मत मांडले. दरम्यान शारदा बडोले यांचा डॉ. अंशू सैनी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनी मांडले. संचालन डॉ. भावना बजारे यांनी केले. आभार रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त शल्यखिकित्सक डॉ. दुधे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, डॉ. अमरिश मोहबे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. सायस केंद्रे, डॉ. तृप्ती कटरे, डॉ. प्रियंका उभाळ, डॉ. दुर्गाप्रसाद पटले, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
रूग्णवाहिकेचे लोकार्पण व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
प्रारंभी शारदा बडोले यांच्या हस्ते वात्सल्य रूग्णवाहिकेचे लोकार्पण आणि महिला समुपदेशन केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. लायंस क्लबचे अध्यक्ष कालुराम अग्रवाल यांनी वात्सल्य रूग्णवाहिकेसाठी एलसीडी टीव्ही भेट दिला. गरोदर मातांना बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात आणणे आणि बाळंतपणानंतर माता व बालकाला घरी सुखरुप सोडून देण्याचे काम वात्सल्य या रुग्णवाहिकेतून करण्यात येणार आहे. या रूग्णवाहिकेवर माता व बालिकेचे चित्र आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करु या हा संदेश, स्त्री भ्रुण हत्या रोखण्यात जनजागृती करण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे.

Web Title: Do not ignore health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.