खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या
By Admin | Updated: September 12, 2016 00:21 IST2016-09-12T00:21:40+5:302016-09-12T00:21:40+5:30
अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे.

खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या
खोडशिवणीचे नागरिक रस्त्यावर: २५ गावांतील लोकांची मागणी
सडक-अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. या कामाला नागरिकांनी तिव्र विरोध केला आहे. या ठिकाणी मानव रहित गेट तयार करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षापासून सदर बांधकामाच्या ठिकाणी अंतर्गत रस्ता किंवा मानव रहित गेट तयार करावी याकरीता चौकशी सुरू आहे. यापूर्वी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी देवरी यांनी रेल्वे प्रशासनासोबत भेट दिली. यावेळी परिसरातील सरपंच, पोलीस पाटलासह लोकांनी भूमीगत पूल (बोगदा) बांधकास विरोध दर्शवून तसेच ठराव सुध्दा कनिष्ठ अभियंता रेल्वे विभाग नागभीड यांना पाठविला आहे. सदर रस्ता साकोली-सडक-अर्जुनी या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याने २५ गावातील जड वाहने हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. सदर ठिकाणी बोगद्याचे बांधकाम केल्यास नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होत नाही. कारण सदर बांधकामाची व रेल्वे स्टेशनला जाण्याकरीता पर्यायी रस्ता राहणार नाही. जागा समांतर पातळीवर आहे व ती तांत्रीक दृष्ट्या बोगदा बांधकामास अयोग्य आहे. बोगदा बांधकाम केल्यास ट्रक, ट्रॅक्टर व बस सारखे वाहनांच्या रहदारीवर परिणाम होईल. हा बोगदा परिसरातील नागरिकांना कायमचे डोकेदुखी ठरेल. रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याची योजना रेल्वे विभागाची असले तरी बोगदा बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल.
रेल्वे विभागाने यापूर्वी कमी वर्दळीच्या ठिकाणी सौंदड, गोंडउमरी, पांढरी रस्ता, नागझिरा रोड येथे मानव रहित गेट तयार केले आहेत. याच ठिकाणी बोगदा बांधकामाचा आग्रह का केला जातो. गोंदिया-चंद्रपूर मार्गावर अनेक ठिकाणी बोगदे बांधले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे जाणे-येणे बंद आहे. त्यामुळे बोगदा बांधकामातील पैशाच्या लाभाचा विचार अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी रेल्वे विभागाने आठ ते दहा वेळा सर्व्हेक्षण करून नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होणार नाही असा रिपोर्ट दिला आहे. यापूर्वीच सदर रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही गेट रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत.
त्यामुळे रहदाराची कायम समस्या निर्माण करणारा बोगदा तयार करू नये, जबरदस्तीने बोगदा बांधकाम केल्यास या परिसरातील नागरिक आंदोलन करतील याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे विभागावर राहील. (शहर प्रतिनिधी)