समाजविघातक भूलथापांना बळी पडू नका

By Admin | Updated: February 28, 2015 01:01 IST2015-02-28T01:01:56+5:302015-02-28T01:01:56+5:30

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस विभागाची असते. पोलिसांची संपूर्ण यंत्रणा ही जनकल्याणासाठीच राबत असते. सामान्य जनतेच्या मदतीचे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करता येते.

Do not fall prey to social evils | समाजविघातक भूलथापांना बळी पडू नका

समाजविघातक भूलथापांना बळी पडू नका

नवेगावबांध : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस विभागाची असते. पोलिसांची संपूर्ण यंत्रणा ही जनकल्याणासाठीच राबत असते. सामान्य जनतेच्या मदतीचे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करता येते. समाजविघातक व राष्ट्रद्रोही लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाणे नवेगावबांध व सशस्त्र दुरक्षेत्र धाबेपवनी यांच्या सौजन्याने रामपुरी येथे आयोजित दोन दिवसीय जनजागरण मेळाव्याच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी गुरूवारी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, गटविकास अधिकारी डी.जी. कोरडे, पंचायत समिती अर्जुनी-मोरगावचे उपसभापती अ‍ॅड. पोमेश रामटेके, वनपरिक्षेत्राधिकारी विलास काळे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार, एमएसआरएलएमचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, सरपंच बुडगेवार, भांडारकर व परिसरातील पोलीस पाटील प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा व आरोग्य शिबिर राबविण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये एकूण ५४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी बारा रुग्णांना पोलीस विभागातर्फे शस्त्रक्रियेसाठी गोंदियाला नेण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी महिलांसाठी रांगाळी स्पर्धा व शालेय विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जयमाता बोदराई देवी मंडळ रामपुरी, द्वितीय क्रमांक आदिवासी गोंडवाना मंडळ एलोडी व तृतीय क्रमांक ग्राम सुधार सोबती क्रीडा मंडळ जांभळी यांनी पटकाविला रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस सरस्वता ताराम, द्वितीय जिजा अलोणे, तृतीय वर्षा खांडवाये व उत्तेजनार्थ रुपाली अलोणे यांनी मिळवीले.
सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध, द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रम शाळा धाबेपवनी व तृतीय क्रमांक श्रीमती उमाबाई संग्रामे विद्यालय नवेगावबांध यांनी मिळाविला. प्रेक्षनिय कवायतीमध्ये जि.प. प्राथमिक शाळा रामपुरी येथील चमू विजेती ठरली. सर्व विजेत्यांना पोलिीस विभागातर्फे थेट वस्तू, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. याप्रसंगी परसिरातील सरपंच, पोलीस पाटील व कबड्डी सामन्यांचे पंच यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागरिकांना व विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. आरोग्य शिबिरासाठी पंधरा डॉक्टरांचे पथक आले होते.
प्रास्ताविक नवेगावबांधचे ठाणेदार सुनिल पाटील यांनी मांडले. संचालन किशोर शंभरकर व आभार सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र धातबेपवनीचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी मानले. मेळाव्यासाठी स.पो. निरीक्षक राठोड, पो.उ. निरीक्षक पवार, पो.उ. निरीक्षक नलावडे, कर्मचारी, सरपंच व पोलीस पाटील व नागरिकांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Do not fall prey to social evils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.