दागिने नको, शौचालय द्या
By Admin | Updated: December 1, 2015 05:58 IST2015-12-01T05:58:20+5:302015-12-01T05:58:20+5:30
महिलांची अब्रू वेशीवर टांगू नका. शौचालय नसल्यास महिला उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे गावात दुर्गंधी

दागिने नको, शौचालय द्या
गोंदिया : महिलांची अब्रू वेशीवर टांगू नका. शौचालय नसल्यास महिला उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे गावात दुर्गंधी पसरते. आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर तिला पतीने दागिने देऊ नये तर तिची अब्रू वाचविण्यासाठी शौचालय भेट द्यावे, असे आवाहन आमगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.एम. खोटेले यांनी केले.
बनगाव येथील महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालयात आयोजित तालुका स्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य पटले प्रमुख पाहुणे म्हणून सहायक गटविकास अधिकारी धस, पत्रकार नरेश रहिले, बोपचे, प्रा.बोरकर, विस्तार अधिकारी डी.एम. खोटेले उपस्थित होते. पटले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी धस म्हणाले, देशात स्वच्छतेची लोक चळवळ निर्माण करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमध्ये लोकसहभागातून निर्णय प्रक्रिया व्हावी या हेतूने केंद्र शासनाने मागणी आधारित लोकसहभागाचे धोरण स्विकारले आहे. राज्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढवून व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमध्ये लोकसहभाग वाढवून संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम निर्मल करण्यासाठी राज्यात लोकचळवळ निर्माण करणे आवश्यक आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (एनआरडीडब्ल्यूपी) व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील युवा शक्तीला पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाकडे आकृष्ठ करुन त्यांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. शासन निर्णयानुसार राज्यात महाविद्यालयीन युवकांसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयावर स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा सन २०१५-१६ चे आयोजन करण्यात आले.
तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात २२ विद्यार्थी स्पर्धक तर वरिष्ठ महाविद्यालय गटात १० विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रथम कनिष्ठ महाविद्यालयीन गटाची स्पर्धा व नंतर वरिष्ठ महाविद्यालयीन गटाची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यांकन नरेश रहिले, सुनील बोपचे, किशोर डी. बोरकर यांनी केले. या तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे निकाल विस्तार अधिकारी खोटेले यांनी जाहीर केला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संचालन गट समन्वयक विश्वनाथ शेंडे यांनी केले. यशस्वितेसाठी प्रीती नंदेश्वर, राहुल बोरकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
यांना मिळाला पुरस्कार
४या स्पर्धेत कनिष्ठ गटातून जि.प. कनिष्ठ महाविद्यालय आमगावची विद्यार्थिनी फरहान बशीन शेख प्रथम, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगावचा प्रद्युम्न संतोष अग्रवाल द्वितीय तर जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाचे आमगावची विद्यार्थी दिव्या सावलराम हरिणखेडे तृतीय ठरली. वरिष्ठ महाविद्यालय गटातून भवभूती महाविद्यालयाचीे विद्यार्थिनी स्वाती विष्णुप्रसाद दुबे प्रथम, पूजा विनोद बागडे द्वितीय, तरुण चंद्रसेन फुंडे तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला.