जिल्हावासीयांनो, मास्क लावणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:08+5:302021-02-07T04:27:08+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना ...

जिल्हावासीयांनो, मास्क लावणे अनिवार्य
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला नसतानाही नागरिकांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. कित्येक नागरिक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. तर बाजार व अन्य ठिकाणांवरही शारीरिक अंतराचे पालन टाळले जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांना मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले आहेत. अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे. ही जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब असली तरिही याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला, असा होत नाही. कारण, आताही दररोज नवीन बाधितांची भर पडत असून, कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. हे टाळता येणार नाही.
अशात जिल्हावासीयांनी आजही पूर्वीप्रमाणेच कोरोनाविषयक ३ शस्त्रांचे न विसरता पालन करण्याची गरज दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याचा अर्थ जिल्हावासी काही भलताच काढत आहेत. नेमकी हीच बाब हेरून व जिल्हावासीयांच्या या अतिरेकी वागणुकीला बघता जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार, असे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मास्क हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरले असल्याने मास्कचा वापर अनिवार्य राहणार, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेशातून कळविले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
------------------------------
५०० ऐवजी आता १०० रुपयांचा दंड
मध्यंतरी कोरोनाचा उद्रेक असताना जिल्ह्यात मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र मध्यंतरी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीत हा दंड कमी करीत १०० रुपयांवर आणला आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी दंडासाठी नाही, तर किमान आपल्या व पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तरी मास्क लावणे गरजेचे आहे.