जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात
By Admin | Updated: August 28, 2015 01:42 IST2015-08-28T01:42:21+5:302015-08-28T01:42:21+5:30
जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा परिषद देवरीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या क्रीडा संकुल ....

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात
सर्व शाळांचा सहभाग : क्रीडा संकुलाच्या कामाला देणार गती
देवरी : जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा परिषद देवरीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या क्रीडा संकुल परिसरात जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांना सुरूवात झाली.
गुरूवारी उद्घाटन (दि.२७) आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार संजय नागटिळक, सविता पुराम, प्राचार्य के.सी.शहारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, संतोष तिवारी, कुलदीप लांजेवार मंचावर उपस्थित होते.
यावेळी आ.पुराम म्हणाले की, तालुका क्रीडा संकुलाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या वर्षात जलतरणाची व्यवस्था करण्याची ग्वाही देताना त्यांनी शाळकरी स्पर्धकांना शिवाजी महाराजाप्रमाणे गनिमीकाव्याने स्पर्धा जिंकण्याचा सल्ला दिला. तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी सुसज्ज क्रीडांगण आणि तेथे योग्य त्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार असल्याचेही आ.पुराम यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौध्दीक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, क्रियाशिलता व महत्वाकांक्षा या पाच गोष्टी असल्यास ते कधीही पराजीत होऊ शकणार नाही. यावेळी आठही तालुक्यातील शाळकरी स्पर्धक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एम.मेश्राम यांनी तर आभार एस.ए.वहाब यांनी मानले. (प्रतिनिधी)