लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे, यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न असून, यातूनच आता जिल्ह्याने नऊ लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील ९,१८,४१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ७० एवढी आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच असून, ही संख्या वाढविण्यावर आरोग्य विभागाचा जोर आहे.
लसीकरणाच्या सुरूवातीपासूनच जिल्हा अग्रेसर राहिला आहे. विशेष म्हणजे १८-४४ वर्ष वयोगटाला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला आणखीन गती मिळाली आहे. शिवाय जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. यामुळेही लसीकरणाला गती मिळाली आहे. याचेच फलित आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत ९,१८,४१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ७० एवढी आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ६,८१,७२२ नागरिक असून, त्यांची टक्केवारी ५२ एवढी आहे तर दुसरा डोस घेणारे २,३६,६९६ नागरिक असून, त्यांची टक्केवारी ८१ एवढी आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असून, नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे धोका वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात नोव्हेंबरपूर्वी नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कारण लस न लागलेली एक व्यक्तीही लस घेणाऱ्या व्यक्तींसाठीही धोक्याची ठरू शकते. मात्र, यानंतरही कित्येक नागरिकांनी आतापर्यंत एकही लस घेतलेली नाही तर कित्येकांनी पहिला डोस घेतला असून, आता दुसऱ्या डोसला टोलवत आहेत. हा प्रकार सर्वांसाठीच धोक्याचा आहे.
----------------------------------
आपल्या कुटुंबीयांसाठी तरी लसीकरण करा
लस हाती आली असतानाही कोरोनाची दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. मात्र, व्यापक लसीकरण न झाल्याने कोरोनाने हा डाव साधल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. कारण लस न लागलेली एक व्यक्ती कित्येकांना बाधित करू शकते व हाच प्रकार दुसऱ्या लाटेत घडला. यामुळे लस न घेणाऱ्यांनी स्वत:साठी नाही तर किमान आपल्या कुटुंबीयांसाठी तरी लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
--------------------------------
दुसरा डोस वेळेवर घ्या
मुदत संपूनही जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस घेतलेला नाही. आता त्यांना कोरोना गेल्यासारखे वाटत असून, ते दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र कोरोना गेला नसून, दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण पूर्णपणे सुरक्षित नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी वेळेवर दुसरा डोस घ्या, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.