जिल्हा डासमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:03 PM2018-04-26T22:03:55+5:302018-04-26T22:03:55+5:30

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.

District free the mosquito | जिल्हा डासमुक्त करा

जिल्हा डासमुक्त करा

Next
ठळक मुद्देरमेश अंबुले : जागतिक हिवताप दिनानिमित्त अधिकारी-कर्मचारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समितीचे सभापती लतादोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत, एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.
मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे, असे सांगून अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मूलनासाठी चांगले काम केले आहे ते कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमित फवारणी करावी. त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरिया निर्मूलन कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नियोजनात चुका झाल्या की रूग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरिया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाºयांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यात या आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासांची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबालवृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मांडले. संचालन किशोर भालेराव यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा येळे यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, आशा सेविका यांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट कार्याची दखल
मलेरियाच्या निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी. थोटे, डॉ. नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पटले, ककोडीचे डॉ. गजानन काळे, केशोरीचे डॉ. पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी. हजारे, खोडशिवनीचे डॉ. खोटेले, शेंडाचे डॉ. डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील तीन आशा कार्यकर्ती, एक़ आरोग्य सहायक, एक आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: District free the mosquito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य