जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केशोरी शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:50+5:302021-03-19T04:27:50+5:30
केशोरी : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील रिक्त पदामुळे बँकेतील व्यवहारासाठी खातेधारकांना बऱ्याच वेळपर्यंत ताटकळत राहावे लागत असल्यामुळे मानसिक ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केशोरी शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा
केशोरी : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील रिक्त पदामुळे बँकेतील व्यवहारासाठी खातेधारकांना बऱ्याच वेळपर्यंत ताटकळत राहावे लागत असल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या बँकेतील कामकाजाचा डोलारा चालवावा लागत असल्याने त्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
प्रत्यक्षात या बँकेत १ व्यवस्थापक, १ लेखापाल, १ वसुली निरीक्षक, १ रोखपाल आणि २ लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ १ रोखपाल आणि १ लेखापाल कार्यरत आहे. लेखापाल प्रभारी व्यवस्थापनाचे काम सांभाळून रोखपालाच्या मदतीने संपूर्ण बँकेतील व्यवहार सांभाळत असल्यामुळे त्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे बँकेची कामे प्रभावित होऊ लागली आहे. याकडे जिल्हा बँक प्रशासनाने लक्ष देऊन विना विलंब केशोरी बँक शाखेतील रिक्त पदे भरण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे. दाेन कर्मचाऱ्यांना बँक शाखेचा व्यवहार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लेखापालाला आपली दैनंदिन कामे आटोपून प्रभारी शाखा व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळावी लागत असल्यामुळे त्यांच्या कामाचा ताण वाढला आहे. त्याचबरोबर रोखपाल व दोन लिपिकवर्गीयांची कामे सांभाळावी लागत असून खातेधारकांची कामे वेळेच्या आत होत नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बँक शाखा नक्षल प्रभावी क्षेत्रात असल्यामुळे बँकेचे व्यवहार रात्रीपर्यंत होणे योग्य नाही. वेळीच जिल्हा बँक प्रशासनाने दखल घेऊन त्वरित या बँकेतील रिक्त असलेली पदे भरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी खातेधारकांनी केली आहे.
......
३५ गावांचा भार या शाखेवर
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील दि.गो.डि.सेन्ट्रल को ऑप बँक शाखेची एकमेव शाखा असल्याने या परिसरातील ३५ गावाच्या शेतकऱ्यांसह शाळेतील कर्मचारी, शासकीय कर्मचारी, महिला-पुरुष बचत गट शासकीय मानधन लाभार्थ्यांची खाती मोठ्या प्रमाणात आहेत. या बँकेत दररोज खातेधारकांची गर्दी दिसून येते. सध्या कोरोनाचे दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण वाढत असल्याने बँकेत गर्दी होणे अपेक्षित नाही. या बँकेसाठी १ व्यवस्थापक, १ लेखापाल, १ रोखपाल, १ वसुली निरीक्षक, आणि २ लिपिकवर्गीय कर्मचारी मंजूर पदे असताना प्रत्यक्षात फक्त २ कर्मचारी कार्यरत आहेत.