फक्त १० शाळांत गणवेश वाटप

By Admin | Updated: July 3, 2015 01:56 IST2015-07-03T01:56:12+5:302015-07-03T01:56:12+5:30

वेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला.

Distribution of uniforms in only 10 schools | फक्त १० शाळांत गणवेश वाटप

फक्त १० शाळांत गणवेश वाटप

कपिल केकत गोंदिया
वेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला. जिल्ह्यातील फक्त १० शाळांतच पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. निधीअभावी हा कार्यक्रम अयशस्वी ठरला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर भागवून घ्यावे लागले.
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. यांतर्गत मूले व त्यांच्या पालकांना शाळेप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. शासनाचा हा उदात्त हेतू लक्षात घेऊन यंत्रणा जोमाने कामाला लागते व विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविते. यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे निर्देश होते.
येथील सर्व शिक्षा अभियानकडून यंदा ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी मागण्यात आला होता. यासाठी सर्व शिक्षा अभियानकडून डिसेंबर महिन्यातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र शासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे जिल्हास्तरावर निधी मिळण्यास बराच उशीर लागला. तर गणवेश वाटपासाठी जिल्हास्तरावरून मागणी करण्यात आलेला निधी विभागाला २२ जून रोजी प्राप्त झाला. निधी प्राप्त झाल्याच्या चार दिवसानंतरच म्हणजेच २६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका वाजणार होता. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करणे अशक्य होते. नेमकी हीच बाब घडली व शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. यातून शासकीय यंत्रणा किती तत्परतेने कार्य करते हे दिसून येते.
पहिल्यांदाच मिळाला पूर्ण निधी
येथील सर्व शिक्षा विभागाने मागणी केल्यानुसार तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी शासनाने पाठविला. मात्र त्यात उशिर झाल्याने गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. ते काही असो मात्र गणवेश वाटप कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मागणीनुसार पूर्ण निधी मिळाल्याचे विभागाकडून कळले. यापूर्वी कधीही शासनाकडून पूर्ण निधी मिळालेला नसल्याचीही माहिती आहे.
५० टक्के शाळांनाच मिळाला निधी
शासनाकडून विभागाकडे आलेला निधी तालुकास्तरावर टाकण्यात आला आहे. मात्र तालुकास्तरावरून अद्याप शाळांपर्यंत निधी पोहचलेला नाही. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५० टक्के शाळांपर्यंतच निधी पोहचला आहे. तर ५० टक्के शाळांना अद्याप निधी देण्यात आलेला नाही. हाती पैसाच नसताना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे कठिण काम होते. त्याचा परिणामही शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून आला.

फक्त १० शाळांत गणवेश वाटप

Web Title: Distribution of uniforms in only 10 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.