विविध रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:36+5:302021-04-19T04:26:36+5:30
गोंदिया : कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्याची ...

विविध रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण
गोंदिया : कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्याची त्वरित दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी दोन हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिली. त्यानंतर रविवारी (दि. १८) खा. पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील विविध रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले.
रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दराने रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांना वेठीस धरल्यास कारवाई करण्यास प्रशासनाला सांगितले आहे रविवारी शहरातील रुग्णालयांना या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले तसेच सोमवारीसुद्धा १५० इंजेक्शनचे वितरण शहरातील रुग्णालयांना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे पूर्ण लक्ष असून ऑक़्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी मेडिकलमधील ऑक़्सिजन टँक लवकर कार्यान्वित करण्यासाठीसुद्धा ते प्रयत्नरत आहे. पालकमंत्री नवाब मलिक यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांची त्वरित अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. बेडची संख्या वाढविणे, ऑक्सिजन कंन्सनट्रेटर मशीन खरेदी, आरटीपीसीआर चाचणी मशीन खरेदी आणि मेडिकलमधील डॉक्टरांची समस्या दूर करण्यात यावी तसेच रुग्णांना वेळीच उपचार मिळेल व त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यास प्रशासनाला सांगितले आहे. सर्वत्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सर्वांनी घरीच राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करावा, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.