‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी मित्रांना कृषी ज्ञानकोष खंडाचे वितरण
By Admin | Updated: July 5, 2014 01:02 IST2014-07-05T01:02:10+5:302014-07-05T01:02:10+5:30
राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तालुका ...

‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी मित्रांना कृषी ज्ञानकोष खंडाचे वितरण
बोंडगावदेवी : राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी दिन म्हणून बुधवारी (दि.२) ला साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील शेतकरी मित्रांना कृषी ज्ञानकोष खंड १ ते ६ चे वाटप करून ग्रामस्थांना आधुनिक कृषी ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी अभिनव प्रयोग करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित कृषी दिन व कृषी ज्ञानकोष खंड वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, एस.जी. धाकले, ए.बी. ठाकूर उपस्थित होते. सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर एन.एच. मुनेश्वर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मुनेश्वर म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी पारंपारिक शेतीकडून शेतकऱ्यांना सुधारित तांत्रिक व आधुनिक शेतीकडे वळवून संपूर्ण राज्यात तथा देशात हरित क्रांती घडवून आणली. त्यांच्या सूचक मार्गदर्शनाने देशात विपुल प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध असून स्वयंपूर्ण होण्यासाठी स्व. वसंतराव नाईक सतत धडपडत राहिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेततळे, शेडनेट हाऊस, ठिंबक सिंचन शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविल्या जात आहेत. शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी वेळोवेळी सभा घेऊन कृषी मार्गदर्शन केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांना कृषी ज्ञान कोष खंड १ ते ६ चे वाटप मुनेश्वर, चांदेवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी कार्यालयातील व्ही.एच. कोहाडे यांनी केले. आत्मा योजना, शेतकरी मित्रांनी करावयाची कामे, समूह गट शेती, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, अनुदानाच्या योजना याबाबत माहिती त्यांनी दिली. आभार ए.एस. उपवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तालुक्यातील शेतकरी मित्र बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
अंगणवाडी पर्यवेक्षिकांची रिक्त पदे भरा
गडचिरोली : लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पर्यवेक्षिकांची जिल्ह्यातील अनेक पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. रिक्त पदांचा परिणाम अंगणवाडी सेवेवर होत असल्याने पर्यवेक्षिकांचे रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात अंगणवाडी कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. अनेक अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे २ ते ३ केंद्रांचा पदभार सोपविण्यात आला तर काही ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकाऱ्यांच्या पदाची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपविण्यात आली आहे.