तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना
By Admin | Updated: May 22, 2015 02:05 IST2015-05-22T02:05:45+5:302015-05-22T02:05:45+5:30
तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट-१८१ ची माहिती मागितली होती.

तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना
आमगाव : तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट-१८१ ची माहिती मागितली होती. त्यात सदर गट क्रमांकावर कुणाचे अतिक्रमण की सदर गट सरकारी आहे, अशी २६ नोव्हेंबर २०१४ रोजी माहिती तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना मागितली. मात्र संबंधित जागेच्या चौकशीनंतर कागदपत्र देण्याचे तोंडी आदेश तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी तसेच सबंधित लिपीक यांना दिले. मात्र तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना करीत सबंधित कर्मचाऱ्यांनी कागदपत्र अद्याप दिले नाही.
धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांची तीन महिन्यांपासून कागदपत्रांकरिता भटकंती सुरू आहे. मात्र ते देण्यास टाळाटाळ होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट क्रमांक १८१ ची माहिती मागितली. सदर गट टिसीएम नालीच्या आत आहे. यावर कुणाचे अतिक्रमण आहे किंवा सरकारी जमीन आहे, याबाबद २६ नोव्हेंबर २०१४ रोजी माहिती मागितली. यावर ४ डिसेंबर २०१४ रोजी अर्जदाराला १८१ गटमध्ये राधेलाल वट्टी धोबीटोला यांचे अतिक्रमण नोंद दाखविण्यात आले. तर नकाशा मात्र गट क्रमांक- १८६ चा देण्यात आला. या दोन गटाच्या फरकामुळे विसंगती असल्याने अर्जदार रेवा पारधी यांनी दोन्ही माहिती चुकीच्या आहेत, असे निदर्शनास आणून दिले. यावर तहसीलदार राजीव शक्करवार यांनी अर्जदाराला अपील करण्याकरिता सांगितले. त्यावर १० फेब्रुवारी २०१५ रोजी अपील सादर करण्यात आले. यावर आदेशान्वये मंडल अधिकारी कोरे व तलाठी मेश्राम यांना मौका चौकशीचे आदेश तहसीलदाराकडून देण्यात आले. यावर सदर जागा तुमच्या मालकीची आहे, असे सांगण्यात आले. लेखी मागितले असता मंडल अधिकारी कोरे यांनी अर्जदाराला अतिक्रमण आहे, असे सांगितले. यावर तर सदर जागा सरकारी आहे, असे सांगून लेखीपत्र तहसीलदार, मंडळ निरीक्षक किंवा तलाठी यांच्याकडून देण्यात आले नाही. अर्जदार रेवा फुलीचंद पारधी यांनी सदर प्रकरण क्रमांक २१२ व गट क्रमांक १८१ ची माहिती मागितली. मात्र तहसील कार्यालयातील संबंधित लिपिकाकडून प्रकरणाची फाईल दिसत नाही, असे सांगितले जाते. सदर फाईल गायब झाल्याचे सांगून अधिकारी दिशाभूल केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)