न्यू इंडिया कंपनीला विमा नाकारणे भोवले
By Admin | Updated: August 29, 2015 01:49 IST2015-08-29T01:49:24+5:302015-08-29T01:49:24+5:30
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा अपघात नसून आत्महत्या आहे, असे सांगत विमा दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार..

न्यू इंडिया कंपनीला विमा नाकारणे भोवले
ग्राहक मंचचा निर्णय : एक लाखाची भरपाई देण्याचा आदेश
गोंदिया : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा अपघात नसून आत्महत्या आहे, असे सांगत विमा दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. ३० दिवसांच्या आत एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
टोलाराम संतुलाल लांजेवार रा.नवेगाव-धापेवाडा (ता. गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे वडील संतुलाल महादू लांजेवार यांच्या मालकीची नवेगाव येथे शेतजमीन आहे. पायी रस्ता ओलांडत असताना २ आॅगस्ट २०१२ रोजी त्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे टोलाराम यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रांसह शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा अर्ज केला. तसेच वेळोवेळी मागितलेल्या दस्तवेजांची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने सदर दाव्याबाबत मंजूर-नामंजूर कळविले नव्हते. त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.
मंचामार्फत सदर विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली. कंपनीने लेखी जबाबात शेतकऱ्याचा मृत्यू अपघाती नसून आत्महत्या आहे. त्यांनी तलाठी प्रमाणपत्र, ६-ड फेरफार, एफआयआर, अपघाताचे स्पष्टीकरण आदी दस्तावेज सादर न केल्यामुळे २८ मार्च २०१४ रोजी विमा दावा फेटाळल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्ते टोलाराम लांजेवार यांनी सर्वच कागदपत्रे सादर केले होते. त्यांचे वकील अॅड. उदय क्षीरसागर यांनी आपल्या युक्तिवादात, कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याचे कळविले नाही. तसेच विमा कंपनीने कसलेही कागदपत्रे मागितले नाही. त्याबाबतचा पुरावा मंचासमोर सादर केला नाही, ही सेवेतील त्रुटी असल्याचे सांगत प्रकरण मंजूर करण्यात यावे, असे म्हटले.
तर विमा कंपनीच्या वकील बघेले यांनी तक्रारकर्त्याने दावा उशीरा दाखल केल्याने, ६-ड फेरफार व एफआयआर दिला नाही म्हणून कंपनीने दावा नाकारल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याची त्यावेळची मानसिक स्थिती व कागदपत्रांची जुळवाजुळव तसेच घरातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करता विमा दावा दाखल करण्यासाठी विलंब लागणे, हे संयुक्तिक कारण ठरले. त्यामुळे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ९० दिवसांनंतरही विमा दावा दाखल केला जावू शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे, असे मत ग्राहक मंचाचे मांडले.
ग्राहक तक्रार न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी तक्रारकर्ते लांजेवार यांची तक्रार मान्य करीत न्यू इंडिया विमा कंपनीला वडिलांच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.