रोगग्रस्त धानपीक नुकसानीचे सर्वेक्षण
By Admin | Updated: November 16, 2015 01:44 IST2015-11-16T01:44:05+5:302015-11-16T01:44:05+5:30
तालुक्यात धानपिकावर रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याची शिफारस करण्यात आली.

रोगग्रस्त धानपीक नुकसानीचे सर्वेक्षण
सालेकसा : तालुक्यात धानपिकावर रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याची शिफारस करण्यात आली.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादनावर जबरदस्त फटकल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशात आपल्या पिकाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी वर्ग महसूल विभाग, कृषी विभागासह सर्व लोक प्रतिनिधी व इतर पदाधिकाऱ्यांशी विनवणी करीत आहे. शेतकऱ्यांच्या या विनवणीला लक्षात घेत आ. पुराम व पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे यांच्या पुढाकाराने यांनी शेतीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. तहसीलदार प्रशांत सांगोळे, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, पं.स. कृषी अधिकारी मडामे यांनी तालुक्यात फिरुन रोगग्रस्त धान पिकाची पाहणी केली. परंतु विभागातील वरिष्ठांकडून कोणतेही सर्वेक्षण आदेश मिळाले नसल्याचेही स्थानिक अधिकारी सांगत आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांची दैनावस्था बघून त्यांना भरपाई मिळावी म्हणून अधिकारी-पदाधिकारी धडपड करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)