विकास कामात होतो भेदभाव
By Admin | Updated: February 9, 2015 23:16 IST2015-02-09T23:16:55+5:302015-02-09T23:16:55+5:30
प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी

विकास कामात होतो भेदभाव
कपिल केकत - गोंदिया
प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी तर नगरसेवक दिसतच नसल्याचे सांगितले, तर काहींनी नगरसेवकांनी केवळ स्वत:च्या घराशेजारील परिसराचाच विकास केल्याचेही बोलून दाखविले. नगरसेवक ज्या परिसरात राहतात त्या भागातच कामे झाली असून अन्य परिसरासाठी त्यांच्याकडे वेळच नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. नगरसेवकांच्या कारभाराशी संतुष्ट नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील परिस्थिती बघता त्यांच्या बोलण्यात वास्तवीकता दिसून आली. परिसरात कामे झाली नाहीत असे म्हणता येणार नाही. मात्र जेवढी कामे करायला पाहिजेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बांधकाम झाले नाही समजता येते. मात्र सफाईचा मुद्दा येथे गंभीर असून नागरिकांत सफाईला घेऊन चांगलाच रोष खदखदत आहे.
अवाढव्य प्रभाग तयार झाल्याने नगरसेवकांनी आपले क्षेत्र वाटून घेतले असल्याचे येथे कानी पडले. क्षेत्र तर वाटण्यात आले मात्र आपल्या क्षेत्राची जबाबदारी पेलण्यात नगरसेवक कुचकामी पडत असल्याचेही चित्र परिसराचा फेरफटका मारला असता दिसले. परिसरात नगरसेवक काम करीत नाही असे बोलता येणार नाही. मात्र कामांच गरज आहे तेथे ते पोहचत नाही. लोकांच्या ऐकून घ्यायला त्यांना वेळच नसल्याचे नागरिक बोलत आहेत. पूणाटोली परिसरात पक्या नाल्यांची स्थिती कच्या नाल्यांपेक्षाही गचाळ आहे. कचरा नाल्यांत पडून आहे मात्र त्याची सफाई करणार कोण. नगरसेवक आपली कामे एकमेकांवर ढकलत असल्याचे कन्हारटोलीतील नागरिकांनी बोलून दाखविले. येथील परिसराची पाहणी केली असता रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. त्यामुळे धूळीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील प्लॉट्स कचरापेटीत परिवर्तीत झाले आहेत. सफाईची समस्या आहे ती आहेच. नाल्या सफाई अभावी दुर्गंधी पसरवीत आहेत. पथदिवे आठ दिवस जळतात व त्यानंतर अंधारासोबतच निभवावे लागते असे चित्र आहे. परिसराची परिस्थिती बघता नुकताच हा परिसर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत घेतला असे वाटते. नगरसेवकांना समस्या सांगावी तर ते ऐकून घेतात व नंतर विसरून जात असल्याचे येथील नागरिक म्हणतात. सफाई म्हटली तर आपली आपल्याचा करावी लागते. अशात पालिका व निवडून दिलेले नगरसेवक मग काय कामाचे असेही बोलले जाते. विशेष म्हणजे नगरसेवक कामांत भेदभाव करतात हा ज्वलंत मुद्दा येथे कानी पडला. नगरसेवक ज्या भागात राहतात त्या भागातच कामे व सफाई होते. आमच्या परिसरात कुणी नसल्याने आम्हाला उघड्यावर टाकण्यात आल्याचे येथील महिला-पुरूषांनी बोलून दाखविले. किमान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तरी ढुंकून बघण्याची अपेक्षाही येथील नागरिकांनी व्यक्त केली.