बेशिस्त वाहतुकीला शाखा लावणार शिस्त
By Admin | Updated: September 10, 2016 00:16 IST2016-09-10T00:16:09+5:302016-09-10T00:16:09+5:30
सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे.

बेशिस्त वाहतुकीला शाखा लावणार शिस्त
प्रत्येक चौकात दोन कर्मचारी : चालानपेक्षा जागृतीवर भर
कपिल केकत गोंदिया
सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. मात्र बाजारातील ही विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने ‘प्लनिंग’ केले आहे. यासाठी आता बाजारातील प्रत्येक मुख्य चौकात दोन कर्मचारी राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत चलान करण्यापेक्षा वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
शहरातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यात बेशिस्त वाहतुकीमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. विशेष म्हणजे बाजार भागातील वाहतुकीच्या कोंडीमुळे अवघे शहर त्रस्त असून बाजारात पाय ठेवणे त्रासदायक वाटू लागले आहे. मात्र बाजारात जाण्याशिवाय गत्यंतर नाही व विस्कळीत वाहतुकीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागतो. मात्र बाजारातील वाहतुकीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने ‘प्लानींग’ केले आहे.
याअंतर्गत गणेशोत्सव बघता वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारपासूनच (दि.४) बाजारातील नेहरू चौक, जयस्ंतभ चौक, गांधी चौक, गोरेलाल चौकात प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय बाजारातील रस्ते मोकळे रहावे यासाठी दोन कर्मचारी पेट्रोलींगसाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनातून अनाउन्सकरिता रस्ता मोकळा केला जाणार आहे. शिवाय चारचाकी वाहनांवर खास नजर राहणार असून त्यापासून वाहतूक विस्कळीत होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
वाहतूक शाखेच्या या विशेष कार्यक्रमांतर्गत चालान करणे सोडून लोकांत जागृती व्हावी यावर भर दिला जाणार आहे. मात्र गरज पडल्यास वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
मुख्य रेलगाड्यांच्या वेळेवर पेट्रोलिंग
प्रवाशांची जास्त संख्या असणाऱ्या सकाळच्या विदर्भ व सायंकाळच्या महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य गर्दीच्या रेल्वे गाड्यांच्या वेळेवर वाहतूक शाखेकडून रेल्वे स्टेशनच्या रेलटोली व बाजार भागातील प्रवेशद्वारांवर स्वत: वाहतूक विभागाचे अधिकारी नजर ठेवून राहतील. तसेच प्रवाशांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पेट्रोलींग करून रस्ते मोकळे केले जाणार आहेत. शिवाय वाहतूक शाखेकडील दोन चारचाकी वाहनांतून शहरात सतत पेट्रोलिंग करून वाहतुकीची समस्या सोडविली जाणार आहे.