जिल्ह्यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई
By Admin | Updated: April 18, 2017 01:07 IST2017-04-18T01:07:08+5:302017-04-18T01:07:08+5:30
मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई
बेरोजगार संस्था सर्वाधिक : सहकार विभागाची कारवाई
गोंदिया : मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. आता या संस्थांना बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापूर्वीही सहकार आयुक्तांच्या आदेशावरून कित्येक संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यात १०१० सहकारी संस्था सुरू होत्या. एक वर्षात यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता ९६३ सहकारी संस्था उरल्या आहेत. या संस्थांमधील काहींजवळ योग्य ते कागदपत्र नसल्याचेही दिसून आले आहे. तसेच नोंदविण्यात आलेल्या पत्यावर संस्थाच नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदर यातून संस्था बनावट असल्याचे स्पष्ट होते. यामुळेच अशा या संस्थांवर कारवाई करण्यात आल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांमध्ये सर्वाधीकबेरोजगारांच्या संस्था आहेत. पूर्वी राज्य शासनाकडून नोंदणीकृत बेरोजगारांना भत्ता दिला जात होता. मात्र भत्ता बंद करून बेरोजगारांच्या संस्था निर्माण करण्याची सुरूवात राज्य शासनाने केली होती. जिल्ह्यात सुमारे ३६० बेरोजगार संस्थांची नोंदणी करण्यात आली होती. नियमानुसार या संस्थांना तीन वर्षे अनुदान द्यावयाचे होते. मात्र पहिल्या वर्षी सुमारे ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आल्यानंतर अनुदान देणे बंद करण्यात आले. या संस्थांना कंत्राटसुद्धा द्यावयाचे होते. मात्र अनेक संस्थांचे संचालक यासाठी तयार नव्हते. कारण अशा या संस्थांची निर्मिती केवळ अनुदानासाठी करण्यात आली होती. अशात अनुदान बंद झाल्याने संस्था फक्त कागदावर होत्या. (शहर प्रतिनिधी)
या संस्था निघाल्या अवसायनात
ज्या संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे त्यात पाच औद्योगिक सहकारी संस्था, एक जंगल कामगार संस्था, दोन उपसा जलसिंचन संस्था, ३० बेरोजगार संस्था, पाच ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, एक गृहतारण संस्था, एक कर्मचारी पतसंस्था, एक अन्य प्रक्रिया संस्था तर एक पाणी वापर संस्था आहे.