आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

By Admin | Updated: September 7, 2015 01:48 IST2015-09-07T01:48:14+5:302015-09-07T01:48:14+5:30

उपलब्ध साधनांतून आपत्तीवर कशी काय मात करता येईल याबाबत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे) बटालियन क्रमांक ५ च्या पथकाने ...

Disaster prevention training | आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

गोंदिया : उपलब्ध साधनांतून आपत्तीवर कशी काय मात करता येईल याबाबत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे) बटालियन क्रमांक ५ च्या पथकाने येथील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्याअंतर्गत गुरूवारी येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकाने एक संयुक्त प्रात्यक्षिक सादर केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार, नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ, प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे उपस्थित होते. याप्रसंगी एनडीआरएफचे पथक व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या आगीवर नियंत्रण कसे करावे, आपत्ती निवारण, प्रथमोपचारावर प्रात्यक्षिक सादर केले.
सर्वसामान्य व्यक्तीला आपत्तीच्या काळात स्वत:चा बचाव करतानाच कुणाची कशाप्रकारे मदत करता येईल, जखमी व्यक्तीला प्रथमोपचार, आगीवर नियंत्रणासाठी काय करावे आदि बाबींची माहिती व्हावी या उद्देशातून एनडीआरएफच्या पथकाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी होमगार्ड पथक, पोलीस पथक, एनसीसी कॅडेट्स, व्हाईट आर्मी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी व मोठ्या संख्येत सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन अग्निशमन विभागातील वाहन चालक मोहनीश नागदवने यांनी केले. आभार नगर परिषद मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
चित्त थरारक अनुभव
आगीतून जिवंत व्यक्तीला बाहेर काढणे, त्या जखमीवर प्रथमोपचार, आगीवर नियंत्रणासाठी करावी लागणारी धडपड हे चित्त थरारक प्रकार बघून अग्निशमन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच अवाक झाले होते. आपला जीव धोक्यात टाकून हे जवान करीत असलेल्या पराक्रमाचे हे चित्र बघून जिल्हाधिकारीही त्यांची प्रशंसा करायचे विसरले नाहीत.
आज देवरीत
२९ जवानांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील बटालियान जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देत आहे. यात ४ सप्टेंबर रोजी खळबंधा, ५ चोरखमारा व ६ सप्टेंबर रोजी बोदलकसा येथे प्रशिक्षण दिले असून सोमवार ७ सप्टेंबर रोजी सिरपूर (देवरी) येथे बोटिंग व पूर परिस्थितील बचाव कार्य यावर प्रशिक्षण देणार आहे.

Web Title: Disaster prevention training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.