जात प्रमाणपत्रांपासून विद्यार्थी वंचित
By Admin | Updated: December 2, 2014 23:07 IST2014-12-02T23:07:56+5:302014-12-02T23:07:56+5:30
तिरोडा तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुट, सवलत व शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे तयार करावयाची प्रकरणे आॅगस्ट व सप्टेंबर

जात प्रमाणपत्रांपासून विद्यार्थी वंचित
कामाचा व्याप अधिक : उपविभागीय अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुट, सवलत व शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे तयार करावयाची प्रकरणे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांपासून तशीच प्रलंबित आहेत. तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांना जात प्रमाणपत्रे न मिळाल्याने विद्यार्थी सवलत व शिष्यवृत्तीपासून वंचित तर राहणार नाही, अशी चिंता त्यांना सतावत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक तिरोडा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करीत आहेत.
या प्रकाराबाबत तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण आठवड्यातून बुधवार व शुक्रवार या दोन दिवशी गोरेगाव तालुक्यात असतो. उर्वरित दिवस तिरोडा तालुक्यासाठी असतात. सध्या झालेल्या निवडणुकीच्या कामामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. तसेच सेतू केंद्रात नुकतेच बदल झाले आहे.
दलालांवरही नियंत्रण ठेवण्याची कसरत करावी लागते. सध्या कोतवाल भरती प्रक्रियेत आम्ही व्यस्त आहोत. शिवाय भूमापन व गोरेगाव तालुक्यातील मध्यम प्रकल्पांची कामे असतात. कामांचा व्याप अधिक व आपल्याकडे मॅन पॉवर कमी असल्यामुळे कामांना विलंब होतो. असे असतानाही आपण आॅगस्ट महिन्यातील जात प्रमाणपत्रांची अर्धी प्रकरणे निकाली काढली आहेत. येत्या एक-दोन दिवसांत उर्वरित प्रकरणे निकाली काढली जातील, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्राची अत्यंत गरज असते.
या सर्व बाबी लक्षात घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्रांची सर्व प्रकरणे त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी व पालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)