चुकीच्या अॅनेस्थेशियामुळे युवतीला अपंगत्व
By Admin | Updated: February 7, 2015 23:25 IST2015-02-07T23:25:46+5:302015-02-07T23:25:46+5:30
पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका बालाघाट जिल्ह्यातील युवतीवर गोंदियात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिला चुकीच्या पद्धतीने अॅनेस्थिशिया (भूल) देण्यात आल्यामुळे कायमचे

चुकीच्या अॅनेस्थेशियामुळे युवतीला अपंगत्व
गोंदिया : पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका बालाघाट जिल्ह्यातील युवतीवर गोंदियात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिला चुकीच्या पद्धतीने अॅनेस्थिशिया (भूल) देण्यात आल्यामुळे कायमचे अपंगत्व आले. याप्रकरणी जिल्हा ग्राहक न्यायमंचाने गोंदियातील डॉ.विकास जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ.नितीन कोतवाल यांनी सदर महिलेला प्रत्येकी १ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बालाघाट (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील बिरसा येथील तरन्नुम परवीर युसूफ अली या युवतीला पाच वर्षांपूर्वी पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिने १५ मार्च २०१० रोजी बालाघाट येथील डॉक्टरांना प्रकृती दाखविली असता त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तरन्नुम परवीनने सोनोग्राफी करून गोंदियातील बी.जे. हॉस्पीटलमधील सर्जन डॉ.विकास जैन यांना रिपोर्ट दाखविले. ते पाहून डॉ.जैन यांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी कुटुंबियांनी होकार दिल्यामुळे लगेच तरन्नुम यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर दि.२० मार्च २०१४ ला तिच्यावर डॉ.विकास जैन यांनी शस्त्रक्रिया करून दि.२३ ला सुटी दिली. मात्र त्यावेळी तरन्नुम परवीन यांनी आपल्या कमरेच्या मागील बाजूने ज्या ठिकाणी भूलीसाठी इंजेक्शन दिले होते त्या ठिकाणी काहीही संवेदना होत नसल्याचे डॉक्टरांना सांगितले. तेव्हा काही दिवसात ही समस्या दूर होऊन पूर्ववत व्हाल, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान संवेदना होत नसल्याची समस्या कायम असल्यामुळे तरन्नुम परवीन यांनी दि.२७ ला पुन्हा डॉ.जैन यांचे रुग्णालय गाठून त्यांना ही समस्या सांगितले. मात्र त्यावेळीही डॉ.जैन यांनी त्यांना समजावून परत पाठविले. मात्र कमरेकडील भागात मागील बाजूने कोणतीही संवेदना होत नसल्याचे आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दि.२ एप्रिल २०१० ला तरन्नुम परवीन यांनी गोंदियातील डॉ.चटर्जी यांना ही समस्या सांगितली. त्यांनी एक्स-रे करण्याचा सल्ला दिला. डॉ.सोनल गुप्ता यांनी दिलेल्या एक्स-रे रिपोर्टमध्ये चुकीच्या पद्धतीने सुंगनीचे इंजेक्शन दिल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. यावर इलाज करण्यासाठी तरन्नुम परवीन यांना नागपूरला भरती करून अनेक चाचण्या करण्यात आल्या. मात्र कोणत्याही औषधोपचाराचा त्यांना फायदा झाला नाही. अखेर याप्रकरणी जिल्हा ग्राहक न्यायमंचात तक्रार करण्यात आली. तरन्नुम परवीन अविवाहित असल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने सुंगनीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांच्यावर कायम अपंगत्व आल्यामुळे डॉक्टरांनी नुकसानभरपाई म्हणून १० लाख रुपये द्यावी असा दावा करण्यात आला.
जिल्हा ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष अतुल आळशी, सदस्य वामन चौधरी आणि वर्षा पाटील यांनी सर्व बाबी तपासल्यानंतर तक्रारकर्त्या तरन्नुम परवीन यांचा दावा अंशत: मान्य केला. त्यांना शस्त्रक्रिया करणारे डॉ.विकास जैन आणि सुंगनी देणारे डॉ.नितीन कोतवाल यांनी प्रत्येकी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. ३० दिवसांच्या आत ही रक्कम दिली नाही तर वार्षिक ९ टक्के व्याजाने पैसे देण्याचे आदेशात नमुद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)