अवघड क्षेत्र निश्चितीत मनमानी

By Admin | Updated: April 21, 2017 01:30 IST2017-04-21T01:30:04+5:302017-04-21T01:30:04+5:30

गोंदिया जिल्हा परिषद सातत्याने कुठल्या तरी कारणांवरून गाजत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांच्या बदलीसाठी

Difficult areas uncertain arbitrarily | अवघड क्षेत्र निश्चितीत मनमानी

अवघड क्षेत्र निश्चितीत मनमानी

जि.प. ला भौगोलिक अज्ञान : अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गावे वगळली
संतोष बुकावन   अर्जुनी-मोरगाव
गोंदिया जिल्हा परिषद सातत्याने कुठल्या तरी कारणांवरून गाजत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांच्या बदलीसाठी अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करावयाचे होते. या निवडीदरम्यान अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गावे वगळून जि.प.ने आपल्या अज्ञानतेचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे कधीतरी आयएसओ ही बिरूदावली प्राप्त करणाऱ्या जिल्हा परिषदेला जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान असू नये, याविषयी चर्चांना उत आला आहे.
शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने २७ फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित केले आहे. शिक्षक संवर्गाची मोठी संख्या तसेच इतर संर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेवून हा बदल करण्यात आला आहे. सुधारित निर्णयानुसार बदल्यांसाठी अवघड व सर्वसाधारण असे दोन गट पाडण्यात आले. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे, दळणवळणाच्या दृष्टिने त्या शाळेत पोहोचण्यास सोयीसुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे ही अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात यावी. जी गावे अवघड क्षेत्रात मोडत नाही, अशा गावांची सर्वसाधारण म्हणून गणना होईल. अवघड क्षेत्र निश्चितीची कार्यवाही करताना परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
या निर्णयानुसार अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चितीची जबाबदारी केंद्रप्रमुखांकडे देण्यात आली. त्यांनी याद्या तयार करून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जि.प. शिक्षण विभागाला पाठविली. मात्र शिक्षण विभागाने या यादीवर विश्वास ठेवला नाही व १७ मार्च रोजी अवघड व सर्वसाधारण क्षेत्राची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीवर आक्षेपासाठी पाच दिवसांची वेळ देण्यात आली. अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून ६९ आक्षेप नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांचा गांभीर्यापूर्ण विचारच केला गेला नाही. १० एप्रिल रोजी जि.प. ने अंतिम यादी प्रसिद्ध केली. यात दुर्गम, तालुका स्थळापासून दूर व दळणवळणाच्या दृष्टिने उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांचा विचारच करण्यात आला नाही.
यादीवर आक्षेप घेतल्यानंतर तालुक्यातील केवळ चार शाळांची वाढ झाली. ही यादी वातानुकूलित कक्षात बसून तयार करण्यात आली. प्रत्यक्ष जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून तयार झाली नाही. त्यामुळे प्रशसन किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. प्रशासनाच्या अशा घोडचुकांमुळे सातत्याने दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांना न्यायालय अथवा मंत्रालयाकडून स्थगिती दिली जाते. याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. असाच प्रकार देवरी तालुक्यातसुद्धा असल्याची चर्चा आहे. अवघड क्षेत्र निश्चितीत जिल्हा परिषदेने शाळांची वास्तविक स्थिती लक्षात घेवून निवड करावी, अशी दुर्गम भागातील शिक्षकांची मागणी आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे अनेक वर्षांपासून अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अन्याय होत आहे.

ठाण्यात संवेदनशील ५१ गावांची नोंद
अर्जुनी-मोरगाव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टिने विस्तीर्ण आहे. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी नोंद आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल ५१ गावांची संवेदनशील, अतिसंवेदनशील अशी नोंद आहे. या परिसरातील अनेक गावात दळणवळणाची साधने नाहीत. तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर शेवटची गावे आहेत. भरनोली शाळा अवघड क्षेत्रात समाविष्ट आहे. मात्र जुनेवानी, शिवरामटोला, नवीनटोला, आंभोरा, वारव्ही यासारख्या गावांचा समावेश नाही. काही शाळांमध्ये तर नक्षलवाद्यांनी काळा ध्व फडकविला. या शाळांचासुद्धा समावेश नाही. जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र निश्चितीत नेमके कोणते निकष लावून निवड केली, हे गुलदस्त्यात आहे.

Web Title: Difficult areas uncertain arbitrarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.