धाबेटेकडीला वनग्रामचा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार
By Admin | Updated: July 29, 2016 01:50 IST2016-07-29T01:50:02+5:302016-07-29T01:50:02+5:30
संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे.

धाबेटेकडीला वनग्रामचा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार
उत्कृष्ट कार्याचे फलित : उपवनसंरक्षकांनी केला समितीचा सत्कार
अर्जुनी-मोरगाव : संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे. यानिमित्त वन क्षेत्र अर्जुनी-मोरगावतर्फे धाबेटेकडीच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वन व्यवस्थापन समितीने सहवनक्षेत्र धाबेटेकडी येथील राखीव वन कक्ष क्रमाक २६८ मधील ४०३.०७० हेक्टर जागेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वन समितीतर्फे सहवनक्षेत्र परिसर व गावात वनीकरण, मृद व जलसंपादण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंधक उपाय, वनक्षेत्रावरील अतिक्रमास प्रतिबंध, अवैध चराईस प्रतिबंध, वन्य पशू पक्षी संरक्षण, पाणवठे, श्रमदान, महिला-पुरूषांचा सहभाग, नवेत्तर पर्यायी इंधनाचा वापर, अभिलेख, नवसंकल्पना व जनजागृती इत्यादी कार्यांची काटेकोरपणए अंंमलबजावणी केली.
यानिमित्त वन विभागाच्यावतीने समितीचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच नुतनलाल सोनवाने, उपाध्यक्ष महादेव रामटेके, सुरेंद्र ठवरे, ओमप्रकाशसिंह पवार उपस्थित होते. धाबेटेकडी या गावाला वनग्राम म्हणून मिळालेला बहूमान हे गावकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. वनग्राम योजनेत मिळालेला पुरस्कार ही गौरवाची बाब आहे. आगामी काळात जोमाने कार्य करून राज्यात प्रथम येण्चा संकल्प गावकऱ्यांनी करावा वनविभाग सदैव गावकऱ्यांच्या पाठिशी राहील असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
संचालन करून प्रास्तावीक क्षेत्रसहायक पी.के.ब्राम्हणकर यांनी केले. आभार वनरक्षक प्रवीण केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनरक्षक नागपूरे, सुलाखे, शहारे, राऊत यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार
सन २०१४-१५ या वर्षातील हा पुरस्कार असून वनग्रामचा पुरस्कार पटकाविणारे धाबेटेकडी हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे. विशेष म्हणजे नागपूर येथे शुक्रवारी (दि.२९) पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जात असून धाबेटेकडी वन व्यवस्थापन समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. दीड लाख रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.