दोघांच्या भांडणात वॉर्डाचा विकास खुंटला
By Admin | Updated: April 5, 2015 01:25 IST2015-04-05T01:25:58+5:302015-04-05T01:25:58+5:30
नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन सदस्य तर कॉंग्रेसचा एकच सदस्य असून शिवसेनेचे प्राबल्य आहे.

दोघांच्या भांडणात वॉर्डाचा विकास खुंटला
कपिल केकत गोंदिया
नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन सदस्य तर कॉंग्रेसचा एकच सदस्य असून शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यातही रंगारी हे उपाध्यक्ष असून स्वच्छता विभाग त्यांच्या अखत्यारीत येतो. अशात शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत प्रभाग ९ चे चित्र आगळेवेगळे असणे गरजेचे आहे. मात्र हा प्रभागही अन्य प्रभागांच्या तुलनेत जास्त समस्यग्रस्त दिसला. पंचायत समिती कॉलनी परिसर रंगारी बघतात. तर लता रहांगडाले यांच्याकडे पैकनटोली परिसर आहे. मात्र येथील राजकीय व्देषामुळे वॉर्डाचा विकास खुंटल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती कॉलनी सारख्या परिसरात एकीकडे सफाईची समस्या दिसली. तर पैकनटोली सारख्या परिसरात चांगले बांधकाम व स्वच्छता दिसून आली. सफाई व बांधकामाची प्रभागात गरज असल्याचे दिसले.
शहरातील मुख्य परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधून विद्यमान उपाध्यक्ष रंगारी निवडून गेले आहे. आजघडीला या प्रभागाला शिवसेनेचा गड म्हणता येणार. शिवसेनेचे तीन सदस्य असलेल्या या प्रभागात उपाध्यक्ष असल्याने या वॉर्डाचा चेहरा-मोहरा अन्य वॉर्डांच्या तुलनेत वेगळा असावा अशी सहाजीकच अपेक्षा आहे. मात्र अन्य वॉर्डांच्या तुलनेत या प्रभागात जास्त समस्या दिसल्या. रंगारी प्रभागातील पंचायत समिती कॉलनी परिसर बघतात. शास्त्री वॉर्ड परिसरातील ते रहिवासी असल्याने त्यांच्या लगतचा हा परिसर आहे. या परिसरात गजानन महाराज मंदिरा समोरील मार्गाने प्रवेश केला असता सुरूवातच रस्त्याचे दचके खात होते. पक्क्या नाल्या नसल्याने उघड्यावरच सांडपाणी वाहत असून दुर्गंध पसरवीत आहे. आतील मुख्य मार्गाची तर पार दुरवस्था झाली आहे. मोठाले खड्डे बघताच रस्ता बदलून टाकावा अशी गत झाली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात नाल्यांचे बांधकाम दिसून येते. रस्त्यांचेही बांधकाम हवे आहे. मात्र नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात. एका ठिकाणी तर नाल्यांतले सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
नागरिकांना विचारले असता काहींनी नगरसेवक येतात असे सांगीतले, तर काहींनी नगरसेवकांचे दर्शन दुर्लभ असल्याचे बोलून दाखविले. तर प्रभागातील दुसऱ्या सदस्य लता रहांगडाले या गणेशनगर निवासी असून पैकनटोली परिसर त्या बघतात. अशात गणेशनगरात काही कामे करावयाची असल्यास राजकीय द्वेषातून विरोधी नगरसेवक अडसर निर्माण करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पैकनटोली परिसरात फेरफटका मारला असता तेथे बांधकामाचे जाळे दिसून आले. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात हवे तसे सिमेंटचे चकाचक रस्ते येथे दिसतात. परिसरात चांगल्या प्रमाणात सफाईही दिसली. मात्र काही ठिकाणी नाल्यांची समस्या कायम असून बांधकामासह सफाईची मागणी केली जात आहे. तुंबलेल्या नाल्यांचे येथे दर्शन झाले. मात्र बांधकामात ही बाब दबून जाते. नगरसेवकांचे नियमीत फिरणे व सफाई कामे केली जात असल्याचे नागरिकांनी सांगीतले. उखडलेला मोक्षधाम मार्ग ही दुरूस्त झाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. पिंकडेपार परिसरात रस्त्यांची समस्या दिसून आली असून सदस्यांनी आपापले वॉर्ड वाटून घेतले असले तरिही प्रभाग एकच असल्याने त्यांनी आपली जबाबदारी समजून कर्तव्य पार पाडावे अशा प्रतिक्रीयाही प्रभागातील काही नागरिकांनी व्यक्त केल्या. एकंदर उपाध्यक्ष रंगारींकडून प्रभागवासीयांनी मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगल्या आहेत. आता सत्तेत असताना तरी त्यांनी पूर्तता करावी एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.